स्वच्छतेवर भारतीय संस्कृतीचा कटाक्ष आहे. या उष्ण हवेत दररोज स्नान हवेच. तीन वेळाही स्नान सांगितले आहे. स्नानाचा महिमा सांगणारी पुराणे आहेत. कार्तिकस्नान, माघस्नान, वैशाखस्नान, वगैरे स्नानांची व्रते सांगितली आहेत. स्नानांचा हा केवढा महिमा ! स्नान केल्याशिवाय खाऊ नये असा दंडक होता. जेवताना जंतू पोटात जाऊ नयेत म्हणून कोण ही दक्षता ! जेवावयास जाण्याआधी हातपाय धुवावयाचे, बाहेरून येताच हातपाय धुऊन घरात जावयाचे. स्वयंपाकघर, देवघर ही तरी पवित्र ठेवावयाची. घरात धूप वगैरे घालावयाचा. स्वच्छतेसंबंधी भरपूर काळजी घेण्यात येत होती. दररोज धुतलेले धोतर नेसावयाचे. शिळे खाऊ नये, तेच वस्त्र वापरू नये, अशी आज्ञा आहे. जेवताना वस्त्रान्तर करून बसावे. ज्या वस्त्राने बाहेर हिंडतो-फिरतो, ते वस्त्र जेवताना नको. ते घामट सदरे वगैरे काढून ठेवा. स्वच्छपणे जेवा.

केस काढण्यातही स्वच्छतेची दृष्टी होती. या उष्ण हवेत घाम येतो. केसांत घामाने घाण होते. मळ साचतो. म्हणून फार केस वाढू न देणे अशी पध्दत अनुभवाने पडली. केस ठेवावयाचेच असतील तर स्वच्छ राखावे, शिकेकाईने धुवावे असे सांगण्यात येईल. स्वच्छता म्हणजेच सौंदर्य हे ज्या दिवशी कळेल तो सुदिन !

आरोग्य का मिळवावयाचे ? शरीरसंपदा का मिळवावयाची ? बळाचा उपयोग काय ? भारतीय संस्कृती सांगते, की बळ हे स्वधर्माचरणासाठी आहे. आपली विविध ऋणे पार पाडण्यासाठी आहे. बळ दुस-यास पिळण्यासाठी नको आहे. बळ दुस-याचे रक्षण करण्यासाठी आहे.

आर्तत्राणाय व: शस्त्रं न प्रहर्तुमनागसि ।
-'तुझे शस्त्र पीडितांचा सांभाळ करण्यासाठी असू दे; निरपराधी जनतेची कत्तल करण्यासाठी म्हणून नको !'

जे दुर्बळ असतील त्यांना मी दरडावणार नाही. दुर्बळांना हात देऊन उठवण्यासाठी माझे बळ आहे. दुर्बळांना बलवान करण्यासाठी माझे बळ आहे. पाश्चिमात्य देशांत नीत्शेचे एक बळाचे तत्त्वज्ञान आहे. 'बळी तो कान पिळी' अशा स्वरूपाचे ते तत्त्वज्ञान आहे. दुर्बळांचे जगात काय काम, दुर्बळांची कीव करता कामा नये, दुर्बळाला फेकून द्यावे, असे ते तत्त्वज्ञान आहे. परंतु अशा तत्त्वज्ञानावर जग चाललेले नाही. दुर्बळांना फेकून द्यावे, असे तत्त्वज्ञान अंगीकारले तर समाज टिकणार नाही. मातेने दुबळ्या मुलाला का वाढवावे ? ते शेंबडे, रडवे मूल, त्याची काळजी का घ्यावी ? माता म्हणते, 'माझे दुबळे बाळ बलवान होईल. मी आज त्याचे बोट धरीन व तो चालू लागेल, माझ्या साहाय्याने एक दिवस ते समर्थ होईल. माझी त्याला जरूर लागणार नाही. दुबळ्या बाळाला बलवान करण्यासाठी, स्वाश्रयी-स्वावलंबी करण्यासाठी माझे बळ आहे.'

जग शेवटी सहकार्यावर चालले आहे. मी दुस-याला हात देईन व तोही उठेल. सारे उठू देत, सारे आनंदाने नांदू देत.

शरीराचे बळ, तसे ज्ञानाचे बळ, तसेच प्रेमाचे बळ. उत्तरोत्तर ही बळे श्रेष्ठतर अशी आहेत. प्रेमाने रानटी क्रूर पशूंसही आपण जिंकून घेतो. शास्त्रीय ज्ञानाने आपण रोग जिंकतो. अंगबळापेक्षा अकलेचे बळ अधिक आणि अकलेच्या बळापेक्षा प्रेमाचे, पावित्र्याचे, शीलाचे, चारित्र्याचे बळ अधिक ! ही तिन्ही बळे आपण प्राप्त करून घेतली पाहिजेत. निरोगी शरीर, प्रेमळ व उदार हृदय, विशाल व कुशाग्र बुध्दी या तिन्हींच्या समन्वयापासून जे बळ निर्माण होईल ते अपूर्व होय.

रवीन्द्रनाथ 'गीतान्जली'त म्हणतात, 'देवा ! हे शरीर तुझे मंदिर आहे; म्हणून ते मी सदैव पवित्र राखीन. हे हृदय तू मला दिले आहेस; प्रेमाने भरून तुला ते मी आणून देईन. ही बुध्दी तू मला दिली आहेस; हा बुध्दीचा दीप निर्मळ व सतेज असा मी सदैव पेटत ठेवीन.'

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel