प्रकरण २ रें
बंडखोर राजपुत्र मूसा
- १ -

प्राचीन काळांतील बहुतेक राष्ट्रें आतां नामशेष झालीं आहेत हें मागील प्रकरणांत आपण पाहिलें.  त्यांतील कांही राष्ट्रें अद्याप जीव धरून कशींतरी राहिलीं आहेत.  परंतु त्यांचा इतका अध:पात झाला आहे, कीं गेल्या कित्येक शतकांत त्यांच्यामध्यें एकहि महापुरुष जन्मला नाहीं.  परंतु प्राचीन काळची तीन राष्ट्रें अद्याप जगलीं आहेत ; जगलीं आहेत एवढेंच नव्हे, तर मानवी संस्कृति व सुधारणा यांवर प्रभावी परिणाम तीं सारखीं करीत आहेत.  आजहि करून राहिलीं आहेत.

कोणती हीं तीन राष्ट्रें ?  चिनी लोक, हिंदू लोक व ज्यू लोक यांचीं राष्ट्रें.  हीं तीन राष्ट्रें का बरें टिकलीं ?  आपण याचें कारण पाहूं तर आश्चर्यकारक शोध लागेल.  आपणांस असें दिसून येईल, कीं हिंदू, चिनी व ज्यू या लोकांनी निराळ्याच प्रकारच्या वीरपुरुषाला वंदनीय ठरविलें.  वीरत्वाचा, विभूतिमत्त्वाचा निराळाच आदर्श त्यांनी मानिला.  युध्दवीर दूर करून ज्ञानवीराला त्यांनी पूजिलें.  तरवार गाजवणार्‍यापेक्षां नवीन हितकर विचार देणार्‍या महापुरुषाला त्यांनी श्रेष्ठ मानलें.  हे लोकहि त्यांच्या आरंभींच्या इतिहासकाळीं कमी युध्देत्सुक होते असें नाहीं.  त्या काळांत जागांतील अन्नाचा सांठा फार कमी असे.  स्वत:चा भाग मिळावा म्हणून सर्वांना निकरानें लढावें लागे.  परंतु लौकरच या तीन लोकांत असे पुरुष जन्माला आले, कीं जे शांतीचीं स्वप्नें रंगवूं लागले.  आसपास विजिगीषु अशा महत्त्वाकांक्षी युध्देत्सुक राष्ट्रांचा गराडा असतां या लोकांत असे महापुरुष जन्मूं लागले, की जें शांतिधर्माविषयीं बोलत ; शांतीचा संदेश देत ; शांतीचीं स्वप्नें बघत.  चीनमध्यें कन्फ्यूत्सी (कन्फ्यूशियस) व लाओत्सी झाले.  भारतांत बुध्द व महावीर जन्मले.  ज्यू लोकांमध्यें अ‍ॅमास, इसैय्या वगैरे कितीतरी शांतिदूत झाले.  या पुरुषांनीं आपापल्या देशवासीयांच्या हृदयांत नवीन उदार आशा-आकांक्षा ओतल्या.  त्यांनीं तेथें शांतीची इच्छा व प्रेरणा रुजविली.  स्वत: जगा व दुसर्‍यासहि जगूं द्या, नांदा व नांदवा, हा त्यांचा संदेश होता.

शांतीचे प्रेषित ज्या या तीन राष्ट्रांनीं दिले तींच राष्ट्रें अद्याप जिवंत आहेत ; केवळ मेल्याप्रमाणें जगत नसून त्यांच्यांत आध्यात्मिक सामर्थ्य व तेज अद्याप तळपत आहे.  त्यांचा तो वैचारिक व आंतरिक जोम अद्याप आहे.  युध्दप्रिय राष्ट्रांनीं स्वत:च खच्ची करून जणुं घेतलें ; स्वत:ची शक्ति नष्ट करून तीं मातींत गेलीं.  हिंदू, चिनी व ज्यू लोकांनीं स्वत:ची शक्ति वायां जाऊं दिली नाही.  आणि म्हणून अद्याप हीं राष्ट्रें नीट उभीं आहेत.  पांच हजार वर्षे निरनिराळ्या संकटांशीं झुंजत ही राष्ट्रें उभीं आहेत.  नाना विरोध व आपत्ती आल्या.  नाना कठिण प्रसंगांतून त्यांना जावें लागलें, प्रचंड लाटा आल्या व हीं राष्ट्रें गिळंकृत केलीं जाणार असें वाटलें.  परंतु नाहीं ; हीं राष्ट्रें टिकलीं.  एवढेंच नव्हे, तर आजहि सन्यत्सेन, बर्गसाँ व आइन्स्टीन, गांधी व टागोर अशीं महान् माणसें या राष्ट्रांनीं दिलीं आहेत.

राष्ट्राच्या जीवन-मरणाचा एक निश्चित नियम आहे असें म्हणावेंसें वाटतें.  हा नियम थोडक्यांत पुढीलप्रमाणे सांगता येईल : ज्या राष्ट्राचें जीवन दीर्घतम असतें तीं पृथ्वीवरचीं अत्यंत शांतिप्रधान राष्ट्रें असतात.  म्हणजेच दुसर्‍या शब्दांत असें म्हणतां येईल, कीं जीं राष्ट्रें रणवीरांना सोडून विचारवीरांना व ज्ञानदेवांना भजतात, तीं राष्ट्रें तरतात.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel