अति महत्त्वाकांक्षी लोक शेवटीं फावतात हें, थोडा वेळ कां होईना, मुसोलिनीच्या लक्षांत आलें, असें १९२९ ते १९३४ या अवधींत वाटत होतें. या चारपांच वर्षांत त्यानें आपल्या स्वभावाला थोडें नियंत्रित ठेवले होतें. त्यानें हुकूमशाही हातीं घेतली तेव्हां तो जरा ऐटींत होता. त्याचीं आरंभींचीं भाषणें गोळ्यांनीं भरलेलीं होतीं, त्यांत 'बुलेट' शब्दाशिवाय एक वाक्यहि आढळणार नाहीं. तो सार्या जगाशीं युध्द करावयाला तयार होता. पण मुसोलिनीच्या या अहंमन्यतेमुळें चिडून सारें जग जेव्हां त्याच्याविरुध्द उठलें तेव्हां तो जरा थंड पडला, त्याच्या वाणींत थोडा संयम आला. तो स्वत:च्या राष्ट्रापुरतें पाहूं लागला, आपल्या राष्ट्राची घडी नीट बसवूं लागला. त्यानें कामगार व भांडवलदार यांचे हितसंबंध नवीन पायावर उभारण्याचा यत्न केला. झगडे विसरून सिंह व उंदीर समाधानानें जवळजवळ राहतील, असें त्यानें केलें. कामगारांचा 'संप करण्याचा' हक्क नष्ट करण्यांत आला. आपण 'कॉर्पोरेट स्टेट' स्थापीत असल्याची घोषणा करून त्यानें सर्वत्र सहकार्याचा कारभार सुरू करण्याचें ठरविलें. प्रत्येक धंद्याचें एक कॉर्पोरेशन व्हावयाचें म्हणजे काय ? मालक व कामगार दोघांचेहि हितसंबंध संभाळणार्या प्रतिनिधींची एक संमिश्र कमिटी स्थापून तीमार्फत त्या त्या धंद्याचे कॉर्पोरेशन चालावयाचें. पण आतांपर्यंत तरी रशियांतल्या कम्युनिस्ट-स्टेटप्रमाणेंच इटलींतल्या कॉर्पोरेट-स्टेटची कल्पनाहि कागदावरच राहिली आहे. ती अद्यापि विचारांतच आहे, प्रत्यक्षांत आलेली नाहीं. खरें बोलावयाचें तर असें स्टेट प्रत्यक्षांत यावें म्हणून खटपटच केली गेली नाहीं, योजनाच हातीं घेतली गेली नाहीं, कार्यक्रमच आंखले गेले नाहींत. पण ही कॉर्पोरेट-स्टेट्स् अस्तित्वांत आलीं तरीहि त्यामुळें कामगारांचा प्रश्न सुटेल असें मुळींच नाहीं. कामगारांची दैना तशीच राहणार. उंदीर व सिंह एकत्र नांदतांना दिसतील खरें; पण उंदीर सिंहाच्या पोटांत नांदणार हें उघडच आहे. आणि कामगारांना पुन: संपाची मात्र बंदी ! कामगारांची मजुरी कमी करण्यांत आली असून त्यामुळें एक-तृतीयांश कामगार कायमचे बेकार झाले. राजकीय उठाठेवी करणारा या नात्यानें मुसोलिनी हुषार असेल. पण त्याच्या ठायीं मुत्सद्देगिरी काडीमात्रहि नव्हती. मुत्सद्देगिरीचें इंद्रियच त्याला नव्हतें. पण तो इटलीच्या अंतर्गत कारभारांत व्यंग्र राहिल्यामुळें तात्पुरता एक फायदा तरी झाला. आंतरराष्ट्रीय चावटपणा करावयाला त्याला अवसरच मिळाला नाहीं. कांहीं दिवसपर्यंत जगाला त्याच्या अंगावरचा शांतीचा झगाच दिसला, आंतील लष्करी चिलखत दिसलें नाहीं.
पण इसवी सनाच्या १९२९ व्या सालच्या जुलैच्या अखेरीस त्याला शांति नकोशी झाली असावी. त्याचें शांतीचें वस्तुत: वरपांगी सोंगच होतें. किती दिवस असेंच राहावयाचें असेंच जणूं त्याला वाटत असावें. त्याचे दांत शिवशिवत होते, त्यांचीं नखें फुरफुरत होतीं. शांतीचीं वस्त्रें फेंकून देऊन पुन: संनध्द होऊन जगाला आव्हान द्यावयाला तो उभा राहूं इच्छीत होता. त्याची सत्ता हळूहळू उळमळीत होत होती, इटॅलियन जनता असंतुष्ट होती. कांहीं तरी बदल व्हावा, असें तिला वाटत होतें. तिचें लक्ष वेधण्यासाठीं कोठें तरी युध्द उकरून काढण्याशिवाय गत्यंतर नव्हतें. ऍबिसिनियावर त्याची वक्रदृष्टि वळली. इटॅलियन तरुणांना तो इथिओपियन लोकांचीं पापें पढवूं लागला, व्देष-विषाचीं इंजेक्शनें देऊं लागला. प्राचीन काळीं कॅटो जितक्या जंगलीपणानें 'कार्थेज धुळीला मिळविलेंच पाहिजे' असें म्हणे, तितक्याच जंगलीपणानें 'इथिओपिया मातीस मिळविलाच पाहिजे' असें मुसोलिनी ओरडूं लागला.