प्रकरण ७ वें
व्देषविहीन जगाचें ध्येय देणारा टॉल्स्टॉय
- १ -

लिंकननें मोठेपणा कसा मिळविला हें पाहणेंच मोठें कौतुकाचें आहे; पण टॉल्स्टॉयनें आपला मोठेपणा कसा फेंकून दिला, त्याचा कसा त्याग केला हें पाहणें अधिक कौतुकाचें आहे. लिंकन धीरोदात्त धैर्यामुळें श्रेष्ठ पुरुष झाला, तर टॉल्स्टॉय आपल्या अनंत प्रेमामुळें व सौजन्यामुळें आपलें प्रतिष्ठित स्थान सोडून बहुजनसमाजांत जाऊन बसला.

बुध्दाप्रमाणेंच टॉल्स्टॉयहि मोठ्या व श्रीमंत सरदार-घराण्यांत जन्मला होता. त्याच्या पूर्वजांपैकीं एक जण पीटर दि ग्रेटचा मित्र होता. तो यास्नाया पोलिआना (म्हणजे प्रकाशमय दरी) येथें १८२८ सालीं जन्मला. वयाच्या दुसर्‍याच वर्षी त्याची आई वारली, नवव्या वर्षी वडील वारले. त्याला दोन भाऊ होते व दोन बहिणी होत्या. हीं सारीं भावंडें दूरच्या एका आत्याच्या ताब्यांत देण्यांत आलीं, तिचें नांव टारिआना. तिच्या ठायीं अत्यंत थोर असे दोन सद्गुण-प्रेम व गांभीर्यवृत्ति-मोठ्या प्रमाणांत होते. येणार्‍या-जाणार्‍या भोळसट यात्रेकरूंशीं फार एकरूप होण्याचा दुबळेपणाहि तिच्या ठायीं होता. ती त्यांना साधुसंत मानी, गूढवादी मानी.

हे यात्रेकरू अनेक गोष्टी सांगत. टॉल्स्टॉयच्या मनावर या गोष्टींचा खूप परिणाम होई. त्याला लागलेली अध्यात्मज्ञानाची गोडी कधींहि सुटली नाहीं. तो दिवसाढवळयाहि जणूं स्वप्नांत रमे, गूढ चिंतनांत मग्न होई ! त्याच्या या वृत्तीमुळें त्याची तीव्र बुध्दि कधीं कधीं झांकोळली जाई. तो एकोणिसाव्या शतकांतला अतिश्रेष्ठ महामति होता; पण त्याच्या गूढ गुंजनामुळें त्याच्या मतीचें तेज कमी होई. तो शाळेंत मथ्थड होता. शाळेंतील शिक्षक तो व त्याचे दोन भाऊ यांच्यांविषयीं नेहमीं म्हणत कीं, ''सर्जियसच्या ठायीं खूप काम करण्याची इच्छा आहे व कर्तबगारीहि आहे; डिमिट्रीला करण्याची इच्छा आहे, पण क्षमता नाहीं; व लिओला कांहीं करण्याची इच्छाहि नाहीं व पात्रताहि नाहीं !''

पण जीवनाविषयीं त्याची सहसा फारशी कोठें न आढळणारी अत्यंत गंभीर दृष्टि होती. वयाच्या पांचव्या वर्षीच तो अशा निर्णयाला आला कीं, 'जीवन करमणुकीसाठीं नव्हे तर फार मोठ्या जबाबदारीसाठीं मिळालेलें आहे.'  वयाच्या सोळाव्या वर्षीच त्याची सनातर धर्मावरची श्रध्द उडाली व त्यानें तात्त्वि परिभ्रमण सुरू केलें. तारुण्याच्या वनांतून तो तत्त्वज्ञानासाठीं हिंडत-फिरत होता, प्रयोग करीत होता. मूळच्या धार्मिक श्रध्देंतून तो अज्ञेयवादाकडे गेला व अज्ञेयवादातून बौध्दिक शून्यवादाला पोंचला. (कशावरच त्याची श्रध्द राहिली नाहीं.)  शेवटीं तो निराश झाला तेव्हां त्याचें वय एकोणीस वर्षांचे होतें.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel