युध्दाला सुरूवात होतांच तोंपर्यंत दाबून ठेवलेल्या त्याच्या मनोवृत्ती खळवळून बाहेर पडल्या. तो सांगतो, माझ्या अंगीं उत्साहाचें वारें ''संचरलें, मी जणूं बेभान झालों. मी गुडघे टेंकलें व भारलेल्या अंत:करणानें ईश्वराचे आभार मानले. अशा युध्दाच्या महापर्वणीच्या वेळीं जिवंत असण्याचें भाग्य मला दिल्याबद्दल मीं प्रभूचे आभार मानले.''

हें युध्दप्रेम त्याच्याजवळ आजहि तितकेंच आहे. जर्मनी व हिटलर यांविषयी जगानें आदर दाखवावयास तयार व्हावें यासाठीं जगाला चाबकाखालीं झोडपून काढण्याकरितां प्रभूनें आपणांस पाठविलें आहे असें त्याला वाटे. जगाविषयीं हिटलरच्या मनांत असलेल्या या अढीला दुर्दैवानें सबळ कारणेंहि होतीं. १९१४ सालच्या महायुध्दांत दोस्त विजयी झाले; पण जुलुमांतून, दडप्येगिरींतून हिंसा पुन: शतमुखांनीं तोंड वर काढते ही मूलभूत गोष्ट, हें नागवें सत्य ते विसरले. आजचा हिटलरिझम हा १९१४ सालच्या महायुध्दाचा अपरिहार्य परिणाम आहे. पराजयांतून सुडाची भावना जन्मते. युध्दांतील प्रत्येक विजय दुसर्‍या युध्दाचीं बीजें पेरीत असतो. हिटलर निमित्तमात्र आहे. तो भवितव्यतेच्या हातांतील एक साधन आहे. विजयानें मदांध झालेल्या दोस्तांच्या मूर्खपणांतून हिटलरिझमचें हत्यार तयार झालें व त्याला धारहि लागली. विजयी दोस्त शतकानुशतकांचा धडा विसरले आणि त्यांच्या या घोडचुकीमुळेंच सारें जग या वेड्या पिशाच्चाच्या तावडींत सांपडलें. स्वत:च्या राष्ट्राच्या वैभवासाठीं सार्‍या जगाचाहि नि:पात करण्यास हिटलर मागेंपुढें पाहणारा नव्हता. कारण, तो तें स्वत:चे जीवितकार्यच समजत असे.

हिटलर हें भवितव्यतेच्या हातांतील एक साधन आहे. तो अनेक अर्थांनी साधन बनला होता. तो व्देषाचें साधर होती, स्वार्थाचें साधन होती; तो अधिक प्रबळ व अधिक हिशेबी अशा दुष्टाच्या हातांतलें बाहुलें होता. त्याचें धोरण त्याचें स्वत:चें नसे. जर्मनींतील लष्करी पेशाचे लोक व कारखानदार हे त्याचें धोरण ठरवीत असत; तो फक्त त्याची अमलबजावणी करीत असे. तो केवळ ट्रॅन्स्मिशनचें साधर होता. आवाज हिटलरचा ऐकूंच् आला तरी शब्द गोबेल्सचे--त्यानें निश्चित केलेले असत; गोबेल्स हाच व्देषाचा पुरस्कर्ता व स्वार्थाचा पैगंबर होता. बर्लिनमधील लष्करवाल्यांनीं व रुहर प्रांतांतील कारखारदारांनीं हिटलरला हाताशीं धरलें आहे. हिटलर उत्कृष्ट बोलतो, श्रोत्याना रडवी, उचंबळावी. त्याच्यांत तडफ होती. तो आपल्यांतील व्देषविष दुसर्‍यांत बरोबर टोंचूं शके. म्हणूनच त्याची निवड लष्करवाल्यांनीं व भांडवलवाल्यांनीं केली होती. एकाद्या मोठ्या युध्दविशारदाची बुध्दि त्याच्या ठाचीं नव्हती. एकाद्या सिव्हिल गुन्हेगाराला असणारी अक्कलहि त्याला नव्हती स्वार्थांध व मदांध लष्करशाहीचा व भांडवलशाहीचा तो एक बेशरम व बेबंध आवाज होता.

हिटलर एकच गाणें, एकच तान, जर्मन चढाईचें एकच गान गाई. त्याच्या मतानें जर्मन तरुणांचें उच्च शिक्षण म्हणजे बंदूक मारावयास शिकणें हें होतें. तो म्हणे, ''जीवनाची पहिल्या नंबरची प्रभावी शाळा लष्कर हीच होय.''  जर्मनीचें परमोच्च ध्येय एकच होतें : तोंडावर अहंकाराची ऐट दाखवून इतर राष्ट्रांमध्यें मिरविणें. तो आपल्या आत्मचरित्रांत लिहितो, ''सार्‍या शिक्षणाची योजना अशी हवी कीं, जर्मन तरुणाला आपण दुसर्‍या कोणत्याहि राष्ट्रांतील तरुणापेक्षा श्रेष्ठ आहों असें नि:शंकपणें वाटावें.''  हिटलरच्या या रानवट मीमांसेला विरोध करणार्‍या आइन्स्टीन, पत्रयूक्टवँटार, थॉमस मॅन, वगैरे सर्वांना त्याने हद्दपार केलें. तो त्यांनीं 'पृथ्वीवरील घाण' म्हणत असे. आपण श्वासोच्छ्वास करतों तेथें श्वासोच्छ्वास करावयाला ते नालायक आहेत असा शेरा मारून तो गर्वानें सांगत असे, ''आम्हांला नकोत हे मुर्दाड लोक ! दुसर्‍या राष्ट्रांनीं यांना खुशाल पाळावें. जितके अधिक पाळतील तितकें बरेंच.'' बुध्दिमान् व प्रामाणिक लोक पाहून तो चिडे, त्याचा अहंकार जणूं दुखावला जाई. जीवनाचें आपलें ध्येय त्यानेंच एका भाषणांत अत्यंत मार्मिक शबदांत असें सांगितलें आहे : जमिनीवर डोकी तुटून पडलीं आहेत, मुंडक्यांच्या राशी पडल्या आहेत हें पाहणे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel