- ३ -
कोलंबस अज्ञात प्रदेशाच्या शोधास कां प्रवृत्त झाला ? त्याची महत्त्वाकाक्षा द्विविध होती : धनार्जनाची व विधर्मीयांस स्वधर्मीय आणण्याची. वेस्ट इंडीज बेटांवर उतरल्यावर आपल्या दोन्ही महत्त्वाकांक्षा आतां सफळ होणार असें त्याला वाटलें. ऑक्टोबरच्या बाराव्या तारखेस तो आपल्या रोजनिशींत लिहितो, ''हे इंडियन चांगले ख्रिश्चन होतील, चांगले गुलाम होतील.'' या लोकांना सहज फसवितां येतें हें पाहून तो आनंदला. तो लिहितो, ''या लोकांना ख्रिश्चन धर्मी करून त्यांचा उध्दार करावा अशी इच्छा मला होती ! पण त्यांना बळजबरीनें ख्रिश्चन धर्म देण्यापेक्षां प्रेमानें ख्रिश्चन करून घ्यावें असें मला वाटतें. त्यांचा सद्भाव, विश्वास लाभावा म्हणून मीं त्यांना लाल टोप्या दिल्या, कांचेचे मणी दिले. फुटलेल्या आरशांचे तुकडे व फुटलेल्या चिनी मातीच्या भांड्यांचे तुकडे घेऊन ते सोनें देत. एका टाकाऊ पट्टयाबद्दल एका खलाशास अडीच कॅस्टेलान्स वजनाचें सोनें मिळालें तेव्हां ही फसवणूक असावी असें कोलंबसाला प्रथम वाटलें व हा असमान व्यापार, ही विषम देवघेव बंद करण्याचें त्यानें ठरविलें. पण असें वाटण्याच्या मुळाशीं न्यायबुध्दि नव्हती, तर इंडियनांचा विश्वास संपादून व त्यांची सदिच्छा मिळवून मग त्यांना गोडीगुलाबीनें ख्रिश्चन करतां यावें व नीट लुटतां यावें असा त्याचा डाव होता. त्यानें राजाला लिहिलें, ''एकदां यांचा विश्वास मला संपादन करूं द्या कीं मग यांना सहज ख्रिश्चन धर्मी करतां येईल व जिंकतां येईल.''
इंडियनांना ख्रिश्चन करणें व नंतर धनकनकसंपन्न होणें या दोन इच्छा त्याच्या मनांत होत्या. या दोन गोष्टी त्याच्या रोजनिशींतील उतार्यांत निरनिराळ्या वेळीं पुन: पुन: दिसतात. इंडियनांमुळें स्वर्गाला आध्यात्मिक फायदा मिळेल व आपणांला ऐहिक वैभव मिळेल या दोन गोष्टी पुन: पुन: त्या रोजनिशींत लिहिलेल्या आहेत. तो नि:शंकपणें राजाला लिहितो, ''हीं बेटें चीन व हिंदुस्थान यांच्या उंबरठ्यांत आहेत. या दोन्ही देशांत अगणित संपत्ति आहे/हिरेमाणकें, मोतीं व सोनें यांना तर अंतच नाहीं ! तुम्हांला हवें असेल तितकें सोनें मी आणून देईन. तुम्हांला हवे असतील तितके गुलाम गलबतांत भरून पाठविन.'' तो पुढें लिहितो, ''या गोष्टीचा सार्या ख्रिश्चन धर्मी राष्ट्रांस आनंद वाटला पाहिजे. त्यांनीं महोत्सव करावे, प्रभूचे आभार मानावे. लाखों लोकांना आपणांस आपल्या धर्मांत घेतां येईल. केवढी उदात्त गोष्ट ! ही जी कृतकृत्यता, तीबद्दल प्रभूचे आभार.''
अशा रीतीनें कोलंबस पौर्वात्यांना सक्तिनें व प्रेमानें ख्रिश्चन धर्मी व गुलाम करण्यासाठीं निघाला होता. पण ती गोष्ट दूरच राहून 'अमेरिकेचा संशोधक' ही पदवी त्याला आकस्मिक मिळून गेली.