दोघांहि ग्रॅच्ची-बंधूंना अशा रीतीनें दूर करण्यांत आलें !  त्यानंतर मॅरियस व सुल्ला या दोघांमध्यें रोमच्या नेतृत्वाविषयी स्पर्धा सुरू झाली.  सुल्ला हा मॅरियसच्या सैन्यांत लेफ्टटनंट होता ; पण आपण आपल्या सेनापतीपेक्षां अधिक पराक्रमी शिपाई व अधिक योग्यतेचे गृहस्थ आहों असें त्याला वाटे.  तो बड्या घराण्यांत जन्मलेला पॅट्रिशियन होता ; मॅरियस गरीब वर्गातला अर्थात् प्लीबियन होता.

त्यांच्या भांडणाची साद्यंत हकीकत सांगत बसण्यांत फारसा अर्थ नाहीं.  त्यांचे परिणाम काय झाले तेवढें पाहिलें म्हणजे झालें.  प्रथम मॅरियसच्या हातीं सत्ता असतां त्यानें सुल्लाच्या बर्‍याच अनुयायांना ठार केलें ; पुढें सुल्लाच्या हातीं सत्ता येतांच त्यानें मॅरियसचे पांच हजार मित्र यमसदनास पाठविले.  प्रत्येकाला वाटलें, ''जितं मया !'' पण रोमला मात्र दोन पराभव सोसावे लागले.  त्या दोघांचे आलटून पालटून विजय, पण मध्यामध्यें रोमचें मात्र मरण ! मॅरियस व सुल्ला यांच्यांतील ही मारामारी पराकोटीला पोंचली असतां रोममध्यें तिच्याकडे लक्ष लावून पाहणारे तिघे तरुण होते.  या यादवींत पुढे काय होतें इकडे त्यांचे डोळे सारखे लागलेले होते.  रोमच्या नेतृत्वाखालीं लढत असलेले ते दोघे जुने कसलेले वीर पाहून या तिघां तरुणांच्याहि मनांत महत्त्वाकांक्षा जागृत झाली व पुढेंमागें रोम आपल्या हातीं यावें, आपणच रोमचे सर्वसत्ताधीश व्हावें म्हणून ते प्राणांचा जुगार

खेळूं लागले.त्या तीन तरुणांची नांवे ऐका : क्रॅशस, पाँपे, सीझर.

- २ -

सुल्लानें ठार मारलेल्या लोकांच्या लिलांवांत निघालेल्या इस्टेटी विकत घेऊन क्रॅशस अत्यंत श्रीमंत झाला.  पाँपे सूल्लाच्या सैन्यांत दाखल झाला व त्याच्या मरणोत्तर तो त्याच्या सेनेचा अधिपति झाला.  त्यानें रोमविरुध्द पुन: पुन: बंड करून उठणारे स्पेनमधले व आफ्रिकेंतले प्रांत पुन: जिंकून घेतले, तद्वतच पूर्वेकडीलहि आर्मीनिया, सीरिया, कॅप्पाडोसिया, पॅलेस्टाईन, पॉन्टस, अरेबिया, फोनिशिया, पॅफ्लागोनिया, इत्यादि कितीतरी प्रदेश पादाक्रान्त केले, लुटले, बेचिराख केले ! परत येतांना पाँपेनें चार कोटी डॉलर संपत्ति लूट म्हणून बरोबर आणली होती.

''पैशाला कधींहि घाण नसते'' अशी रोमन लोकांत प्रचलित असलेली एक विशिष्ट म्हण आहे.  पैसा कसाहि मिळविला तरी तो पवित्रच !  पैसा कसा मिळविला ही गोष्ट महत्त्वाची नसून किती मिळविला ही गोष्ट महत्त्वाची आहे.  रोमन लोक क्रॅशस व पाँपे यांची पूजा करूं लागले.  'रोमचे सर्वांत थोर दोन सत्पुत्र' अशी त्यांची ख्याति झाली !

पण त्या कांळी रोम शहरांत दोन मोठ्या माणसांना वाव नसे.  क्रॅशस व पाँपे परस्परांचा द्वेष करीत.  शहराची सर्व भक्ति व प्रीति फक्त आपणांसच मिळाव्या यासाठीं ते हातघाईवर आले.  त्यांची उघड लढाई होणार असें दिसूं लागलें.  पण सीझरनें मध्यस्थी केली व त्यांचे भांडण तात्पुरतें थांबले.  सीझरच्याहि मनांत स्वार्थी महत्त्वाकांक्षा होत्याच व त्यांच्या पूर्ततेसाठी क्रॅशसची संपत्ति व पाँपचें वजन दोहोंचीहि त्याला जरुरी होती.  म्हणून त्या दोघांनीं परस्परांशीं न लढतां एकत्र यावें असें त्यानें सुचविलें. 'जगाला लुटण्यासाठीं आपण तिघे मिळून करार करूं या' असें त्यानें सुचविल्यावरून 'पहिलें त्रिकूट' या नांवानें इतिहासांत प्रसिध्दि पावलेला जगांतील पहिला त्रिमूर्तीचा संघ स्थापन झाला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel