ते गैरसमज करून घेत व त्या राज्यांत कोणाला कोणते अधिकार मिळणार याबाबत त्याच्याशीं भांडूं लागत ! ते त्याला विचारीत, ''ते स्वर्गाचें राज्य आल्यावर तुमच्या उजव्या बाजूला कोण बसणार, डाव्या बाजूला कोण बसणार, मंत्री कोण होणार, सेनापति कोण होणार ?'' ते लोक वयानें वाढलेले असले तरी एका दृष्टीनें अडाणी मुलेंच आहेत असें त्याला आढळून येई.  दरिद्री, करुणास्पद पण वंदनीय मुलें.  वाईट करण्याची त्यांची शक्ति तेवढी वाढलेली होती ; इतर बाबतींत ते मुलेंच होते, अपरिपक्वच होते.  आणि भोंवतालच्या असल्या लोकांत वावरतां वावरतां, त्यांचे अडाणी प्रश्न ऐकतां ऐकतां, ख्रिस्ताला हळूहळू कळून चुकलें कीं, तो मुलांमध्येंच वावरत होता.  कांहीं मोठीं मुलें, कांहीं छोटीं मुलें, पण सारीं मुलेंच ! त्या मुलांच्या जगांत एकटा तोच काय तो मनानें व बुध्दीनें वाढत होता, प्रौढ व परिपक्व होत होता.  बौध्दिक व नैतिकदृष्ट्या तोच तेवढा वाढत होता.  आणि हें कळून आल्यावर तो रागावेनासा झाला. तो त्यांची कींव करूं लागला.  त्याला त्यांच्याबद्दल करुणा वाटूं लागली.

तो त्याच्या आयुष्यांतला संक्रमणाचा क्षण होता.  सहानुभूतीची व प्रेमाची वेगळीच दृष्टि त्याला फुटली : मुलांचा द्वेष वा मत्सर करण्यांत, त्यांच्यावर रागावण्यांत, त्यांच्याशीं आदळआपट करण्यांत काय अर्थ ? त्यांना शिव्याशाप देण्याचा, त्यांना शिक्षा करण्याचा काय उपयोग ? ज्यांना विचार नाहीं, ज्ञान नाहीं, त्यांच्यावर तरवार उगारण्याचा काय उपयोग ? कां आपण फुकट दांतओठ खावे ? प्रेमळ शब्दांनीच त्यांची कानउघाडणी करणें बरें नव्हे का ? करुणेच्या, क्षमेच्या शस्त्रानेंच त्यांना शिक्षा करणें अधिक शहाणपणाचें नाहीं का होणार ?.

म्हणून त्यानें आपला पवित्रा बदलला, आपलें धोरण बदललें.  जगांत झगडे उत्पन्न करण्याची इच्छा आतां त्याच्या ठायीं राहिली नाहीं.  त्यानें आपला तापट स्वभाव सोडला.  तो शांत व संयमी झाला.  अत्याचारानें वा हिंसेनें अन्यायाविरुध्द लढणें त्यानें सोडून दिले.  सदैव युध्दाची भाषा वापरून पापाला डवचण्याचें वा चिडविण्याचें त्यानें बंद केले.  इतकेंच नव्हे तर तो शांततेच्या सनातन युध्दांतला शांततेने लढणारा कर्मवीर बनला.  तो चाबूक व तरवार टाकून देऊन क्षमा, दया व प्रेम या अधिक प्रभावी व प्रबळ शस्त्रास्त्रांनीं संनध्द झाला.  तो मानवांमध्यें सदिच्छेचा संदेश पसरवीत फिरणारा परिव्राजक बनला.  ''शत्रूला ठार मार'' अशी प्रार्थना देवाला करणारा पूर्वीचा येशू आतां राहिला नाहीं.  तो आतां पर्वतोपनिषद् देणारा, परिणतप्रज्ञ असा सर्वस्वी निराळा महात्मा झाला.  आतां त्याचा संदेशहि बदलला : शत्रूवर प्रेम करा, त्याच्या अज्ञानाची कींव करा, अडाण्यांना कळावें—समजावें म्हणून त्यांना शिकवा, तुम्हांला शिव्याशाप देतील त्यांनाहि आशीर्वाद द्या, छळणार्‍यांच्याहि आत्म्यांसाठीं प्रार्थना करा, दुष्ट हृदयाच्या लोकांना रोगी समजून त्यांची शुश्रूषा करा, त्यांचें हृदय शुध्द व निरोगी होण्यासाठी दयाळू वैद्याप्रमाणें त्यांच्यावर प्रेम करा, आजारी माणूस सेवा करणार्‍यासच वाताच्या भरांत मारतो, तद्वत् हे रोगी हृदयाचे मानव त्रास देऊं लागले, मारूं लागले, तरीहि त्यांची सेवाच करीत जा.

शेवटीं ख्रिस्ताला अटक झाली.  त्याचे सारे शिष्य आपणहि गिरफदार होऊं या भीतीनें पळून गेले !  त्याचे शत्रू त्याच्या रक्तासाठीं तहानले होते; पण सॉक्रे़टिसाप्रमाणेंच ख्रिस्तानेंहि आपल्या बचावाची कांहींहि तयारी केली नाहीं.  हातांत तरवार घेऊन पीटर त्याला वांचवूं पाहत होता ; पण येशूनें मंद स्मित केलें.  भाले, तरवारी वगैरे नेहमींचीं जुनाट हत्यारें घेऊन मारण-मरणाचा खेळ खेळण्याच्या स्थितीच्या पलीकडे तो गेला होता.  तो या झगड्यांच्या पलीकडे गेला होता.  तीं पोरकट भांडणें त्यानें केव्हांच मागें टाकलीं होती !  तरवारीनें मिळविलेल्या विजयांतून पुन: नवीन युध्देंच निर्माण होतात ही गोष्ट त्यानें नीट ओळखली होती.  आश्चर्यचकित झालेल्या पीटरला तो म्हणाला, ''म्यानांत घाल ती तरवार ! जे तरवार हातीं घेतील ते तरवारीनेंच मरतील !''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel