राजा म्हणाला, 'फकीरजी ! तुम्ही काय म्हणत होता ?'

फकीर म्हणाला, 'महाराज ! मी तुम्हाला नव्हतो नावे ठेवीत. मी देवाला नावे ठेवीत होतो.'

राजा हसून म्हणाला, 'म्हणजे तू राजाला नावे ठेवण्यास भितोस; परंतु देवाला नावे ठेवावयास भीत नाहीस ! बरे ते असो. तुझ्याजवळ काही नाही अगदी ?'

फकीर म्हणाला, 'काही नाही. घरदार नाही. वतनवाडी नाही.'

राजा म्हणाला, 'हे बघ, मी आंधळा आहे. तुला दोन डोळे आहेत ना ?'

फकीर म्हणाला, 'होय महाराज.'

राजाने विचारले, 'त्या दोन डोळयांतील एक डोळा मला विकत देशील ? तू मागशील ती किंमत मी देईन.'

फकिराने मनात विचार केला. त्याला वाटले की, एक डोळा दिला तरी एक डोळा राहील. एका डोळयाने माझे काम होईल. एक डोळा देऊन टाकीन. जन्माचे दारिद्रय तरी फिटेल.

फकीर म्हणाला, 'राजा डोळा द्यावयास मी तयार आहे.'

राजा म्हणाला, 'बोल किंमत.'

फकीर विचार करु लागला. काय किंमत मागावी ? डोळयाचा भाव काय असतो, ते त्याला माहीत नव्हते.

राजा म्हणाला, 'विचार कसला करतोस. मागशील ते मिळेल.'

फकीर भीत भीत म्हणाला, 'दोन हजार रुपये.'

राजा प्रधानाला म्हणाला, 'याला दोन हजार रुपये द्या व याचा डोळा घ्या.'

फकिराला वाटले होते की, राजा घासाघीस करील. परंतु राजा एकदम तयार झाला हे पाहून, आपण फार कमी किंमत मागितली असे त्याला वाटले. तो राजास म्हणाला, 'राजा, दोन हजार नाही पाच हजार.'

राजा प्रधानाला म्हणाला, 'याला पाच हजार द्या व डोळा घ्या.'

फकीर पुन्हा मनात चमकला. तो फिरुन पुन्हा म्हणाला, 'राजेसाहेब, तुमच्याजवळ मागावयास मी भितो.'

राजा म्हणाला, 'एकदा काय किंमत मागायची ती माग. भीती कशाची ? डोळा तुझा आहे. सौदा पटला तर दे. नाही तर तू जा. मी काही अन्यायी राजा नाही. भिऊ नकोस. दहा हजार, पन्नास हजार काय ती किंमत सांग. परंतु पटकन सांग. मला वेळ नाही. पुष्कळ कामे आहेत.'

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel