My Spirit flew in feathers
That is so heave now


यातील पहिला चरण पटकन् म्हणा. जणू पृथ्वीवरुन पाखरु उडून जात आहे. परंतु दुसरा जरा जड आवाजात म्हणा. पहिल्या चरणात तुमचे हृदय हलके आहे असे दाखवा व दुसरा चरण म्हणताना चिंतेच्या बोजाने जड झाले आहे, असे दाखवा.

I remember, I remember

ही कविता सुरेख आहे. या कवितेच्या दुस-या श्लोकात कवी म्हणतो. 'माझ्या भावाच्या वाढदिवशी आम्ही लँबरमन नावाचे झाड लावले; परंतु आज ते लँबरमन झाड मात्र जिवंत आहे ! 'ते झाड मात्र जिवंत आहे !' या चरणाच्या पुढे उद्गारचिन्ह आहे.' केशवरावांनी आम्हास विचारले, 'हे उद्गारचिन्ह येथे काय म्हणून ? काय त्यात स्वारस्य आहे ?' आमच्या वर्गात एकालाही त्या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. शेवटी केशवराव म्हणाले, 'भावाच्या वाढदिवशी ते झाड लावले. तो भाऊ आता जिवंत नाही, एवढा अर्थ त्या उद्गारचिन्हात भरलेला आहे. झाड मात्र जिवंत आहे; परंतु भाऊ कोठे आहे ? हे दु:ख दाखविण्यासाठी ते उद्गारचिन्ह आहे. हा भाव त्या उद्गारवाचकाने दाखविला. कवीने येथे हा अर्थ सूचित केला आहे. स्पष्टपणे प्रगट न करिता तो अप्रत्यक्ष ध्वनित केला आहे. जे काव्य सूचक असते ते फार सुंदर होय. संस्कृतात ध्वनी हा काव्याचा आत्मा मानला आहे, व्यंग्यार्थ ही काव्याची खरी शोभा मानली आहे.'

त्या वेळेस आम्हाला आमच्या शिक्षकांनी ध्वनिकाव्याचे महत्त्व सांगितले. परंतु अजूनही ध्वनिकाव्याचे महत्व मला पटले नाही. जे सौंदर्य सर्वांना समजणार नाही, ते काय कामाचे ? काव्यातील किंवा कलेतील अर्थ समजावून सांगण्याची कधी आवश्यकता राहू नये. द्राक्ष हातात पडले की, तोंडात गेले. द्राक्षातील रस मुलांना काढून दाखवावयास नको. त्याप्रमाणे काव्यातील रस समजावून सांगण्याची गरज राहू नये. परंतु नारळ हा फोडावा लागतो. तेव्हा आतील रसाशी गाठ पडावयाची. रवीन्द्रनाथांच्या गीतांजलीतील काही गीतांचा अर्थ स्पष्टपणे प्रतीत होत नाही, त्यात डोके खुपसून बसावे लागते. 'उंच उंच गवत म्हणजे काय व तेथे दिवा आणणारी स्त्री कोण, काही कळत नाही.' 'हा घडा तू पुन्हा पुन्हा भरतोस व रिकामा करतोस, हा घडा कोणता ? तुरुंगात रवीन्द्रनाथांची गीतांजली मी अनेकांजवळ वाचली. 'हा घडा म्हणजे जीवनाचा घडा' असे मी सांगताच बाकी अर्थ मुलांस एकदम समजे. नुसत्या घडयाऐवजी जीवनाचा घडा असे शब्द वापरले असते तर माझ्या मदतीशिवाय मुलांस अर्थ समजला असता. रवीन्द्रनाथांकडे एकदा एक गृहस्थ गेला व त्यांना त्यांच्या काही क्लिष्ट गीतांतील अर्थ विचारु लागला. रवीन्द्रनाथ म्हणाले, 'अर्थमनर्थम् भावय नित्यम.' काव्य म्हणजे शवच्छेदन नाही हे खरे; परंतु काव्य म्हणजे केवळ संगीतही नव्हे. संगीतात अर्थ न समजला तरी आत्मा डोलतो; परंतु अर्थ न समजता काव्य गुणगुणल्याने खरे समाधान लाभणार नाही.

क्षेत्रातल्या ठिकाणी देवाने दर्शन घ्यावयास ज्याप्रमाणे मध्यंतरी पंडयाबडव्यांची जरुर लागते, त्याप्रमाणे ध्वनिकाव्यातील अर्थमूर्तींचे दर्शन घेण्यासाठी टिपणांची व प्रवचनांची जरुर लागते. वाचकाला एका झेपेसरशी अर्थाला मिठी मारता आली पाहिजे. मधल्या दलालांची उठाठेव कशाला ?

टॉलस्टॉयने लिहिले आहे. आपली भावना पुष्कळांच्या हृदयात जाऊन बसावी असे जर कलावानास वाटत असेल तर जास्तीत जास्त लोकांना समजेल अशा रीतीनेच ती भावना तो प्रगट करील. कलावानाचा अनुभव जर मौल्यवान असेल तर तो सर्व जगाने लुटावा, असे साहजिकच त्याला वाटेल. सूर्याचे किरण जसे सर्वांना समजतात, त्याप्रमाणेच कलेतील अर्थ स्वच्छ व स्पष्ट शब्दांतून वा रंगांतून वा आकृतींतून प्रकट झाला पाहिजे. सरलता आली म्हणजे सौंदर्यहानी होईल असे नाही.'

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel