आत्याकडे मला सुने सुने वाटत असे व शाळेतही मी पुष्कळ वेळा एकलकोंडयासारखा वागत असे. आत्याकडचे सुनेपण कधी एखादी गंगूताई येऊन दूर करी व मार्त्याला अमृतत्वाचे दर्शन घडवी. शाळेतील सुनेपण कोण दूर करणार ? मी इतर सवंगडयांबरोबर गप्पागोष्टी करीत असे. हे सारे सवंगडी माझ्या जीवनाच्या अंगणात जमत. परंतु माझ्या हृदयगाभा-यात शिरावे, असे त्यांनाही वाटत नसे व हृदयगाभा-यात त्यांना नेऊन बसवावे, असे मलाही वाटत नसे.

दापोलीस शाळेत मी दुस-या इयत्तेत चार-पाच महिने होतो. त्या काळात मी कोणाशी फारसे बोलल्याचे मला आठवत नाही. पुढे मी तिस-या इयत्तेत गेलो. तिस-या इयत्तेचे वर्ग-शिक्षक मला फार नावे ठेवीत. मुलांच्या कोमल भावना भावनाहीन शिक्षकांस काय समजणार ? मुले म्हणजे दगडधोंडे, बैल, गध्दे असे समजणा-या शिक्षकास मुलांच्या हृदयातील क्षुधा कशी कळणार ? त्या शिक्षकांनी नावे ठेवली म्हणजे मी मनातल्या मनात तडफडत असे. आतल्या आत जळत असे. माझ्या हृदयाला कोण विसावा देणार, कोण शांती देणार ?

एके दिवशी वर्गशिक्षक इंग्रजी वाचन घेत होते. मी फार चांगले वाचीत असे. लहानपणी मी पोथी वाचीत असे. तेव्हाही माझे आजोबा-आजी म्हणत, 'श्याम ! तू किती गोड वाचतोस ! ऐकत रहावे असे वाटते.' वाचणे ही साधी गोष्ट नाही. मी माझ्या वाचनातही हृदय ओतीत असे. तेथील भावनांशी मिळून जात असे. एकदा पालगड गावी मला एकाने केसरी वाचावयास दिला होता. मी मराठी चौथीपाचवीतच तेव्हा होतो. परंतु माझे केसरी वाचन ऐकून त्या गृहस्थांनी मला एक चवली बक्षीस म्हणून दिली. माझ्या आईला ते दोन आणे लाखो रुपयांपेक्षा मोलवान वाटले.

दोन-चार मुलांनी वाचून दाखविले. वर्गशिक्षक मुलांना म्हणाले, 'आता श्याम वाचून दाखवील ते ऐका कसे वाचतो, कोठे थांबतो, कसे स्वर काढतो, कोठे जोर देतो, सर्व गोष्टींकडे नीट लक्ष द्या' मुलांना असे सांगितल्यावर ते मला म्हणाले, 'ऊठ रे बावळया ! नीट वाचून दाखवा.' हे शिक्षक मला नेहमी 'बावळया, बावळया' म्हणून संबोधीत असत. ते शब्द ऐकून माझ्या हृदयाचे पाणी पाणी होई. खरोखरीच का आपण 'बावळट' आहोत असे मनात येई. माझा बावळटपणा दूर करणे, हे त्या शिक्षकांचे काम होते; परंतु मार्ग न दाखविता नेहमी त्या त्या विशेषणाने मला हाक मारीत गेल्याने माझा बावळेपणा वाढला मात्र असेल. आजही माझे मित्र मला बावळटच म्हणतात आणि परकेही कधी कधी 'बावळट मूर्ती' असा माझा उल्लेख करतात. माझा हा बावळटपणा त्या शिक्षकांनी निर्माण केला आहे.

वाचावयास मला सांगितले, याचा मला आनंद झाला. परंतु तो आनंद दु:खमिश्रित होता. 'बावळया वाच' यातील एका शब्दाने हृदय विध्द झाले; तर दुस-या शब्दाने हृदय सतेज झाले. मला वाटे, मी जगात कोणालाच आवडत नसेन का ? मला पाहून कोणालाच आनंद वाटणार नाही काय ? 'बावळट बावळट' असे हिणविण्यात येऊन सदैव या जगात माझा उपहासच होणार का ? मी माझ्या आईला चांगला दिसतो. 'माझा गुणांचा श्याम' अशी ती हाक मारील; परंतु आई सदैव दूर. माझ्या जवळपास असे कोणी नाही की, ज्याला मी गोड वाटत असेन.

किती मुलांची मने आपण दुखावितो याची शाळेतील शिक्षकांना खरोखर कल्पना नसते. त्यांचा होतो खेळ; परंतु मुलांचा जातो जीव. माझ्या समोरची मुले प्रभूची मूर्ती आहेत, ही भावना शिक्षकांची हवी. कलकत्ता शहरात एक महाराष्ट्रीय संन्यासिनी रहात होती. मुलींची शाळा चालवीत असे. एकदा स्वामी विवेकानंद त्या संन्यासिनीचे दर्शन घेण्यासाठी गेले. स्वामी विवेकानंदांनी वंदन केले व विचारले, ' माईजी ! आपण काय करीत आहात ?' त्या थोर संन्यासिनीने उत्तर दिले, 'या मुलींची, या देवतांची सेवा करीत आहे.' किती थोर व अर्थपूर्ण शब्द ! सारे शिक्षणशास्त्र थोडक्यात या शब्दांत येऊन गेले आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel