माणकताईचा त्या दिवशीचा चेहरा मी कधीही विसरणे शक्य नाही. मुलाची वेटोळी नाही का माता काढीत; मग मुलाच्या पित्याची काढली म्हणून काय झाले ? केवढा उदार विचार तिच्या मनात येऊन गेला ! खरोखरच कधी कधी पत्नीला पतीची आई व्हावे लागते, पतीला सांभाळावे लागते. परंतु माणक का फार मोठी होती ? सतरा-अठरा वर्षांची होती. किती यमयातना तिला भोगाव्या लागत होत्या ? देवाने तिच्या पतीला धडधाकट शरीर दिले होते. मजबूत पाय दिले होते. परंतु पायांनी संडासापर्यंत चालत जाण्याची तसदी तो भला गृहस्थ घेत नसे ! सत्तेची दासी मिळाली आहे, मग शक्यतो पायांना का त्रास द्यावा, असे तो नराधम मनात म्हणे. मनात कशाला, माणकजवळ उघड उघड निर्लज्जपणे म्हणे. असे हे मानवजातीचे मासले पाहिले म्हणजे किती संताप येतो ! परंतु माणकवर अपरंपार प्रेम करणारा तिचा आजोबा त्या गोष्टीस तोंड देऊ शकला नाही. त्याने माणकला सासरी का पाठवावे ? 'नाही पाठवीत त्या नरकात असे स्वच्छ व स्पष्ट त्याने का सांगितले नाही ? लोकलज्जा, अब्रू या शब्दांना तो भीत असे. माणकच्या प्राणापेक्षा रुढीची अब्रू त्याला मोलवान होती. समाज बंडखोर झाल्याशिवाय ही अनंत आपत्ती कशी दूर होणार ? हे बंड स्त्रियांनीच केले पाहिजे व आपले स्वत्व सिध्द केले पाहिजे.

त्या माणकच्या गोष्टी आठवून आजही शोकसंतापाने माझे हृदय जळत आहे. लहानपणी मला वाटे, 'माणकच्या नव-याच्या नाकावर दगड मारावा. तो एखादे वेळेस झोपाळयावर निजलेला दिसला तर त्याच्या नाकावर बुक्की मारुन पळून जावे.' परंतु दुबळया भेकड श्यामला धैर्य झाले नाही. दु:ख ओकता ओकता माणक माझ्याजवळ रडू लागली म्हणजे मला रडू आल्याशिवाय रहात नसे. ते माझे अश्रूच माणकच्या मर्मांतिक जखमास काय मलम लावीत असतील ते खरे.

माणक मला माहेरी पत्रे लिहावयास सांगावयाची. तिची पत्रे मीच पोस्टात नेऊन टाकीत असे. पत्रामध्ये सासरच्या हालअपेष्टांचे वर्णन ती करीत नसे. मोघम मोघम लिहावयाची. माहेरच्या गोड प्रेमळ आठवणींनीच ती पत्रे भरलेली असत. माणकचा श्याम हा बाल लेखक होता. माणक सांगावयाची व तो लिहावयाचा. 'आजोबा ! तुमची माणक लहानच का नाही हो राहिली ? मी कायमची लहान राहिल्ये असत्ये तर तुमच्या कुशीत कायमची झोपल्ये असते. तुमच्या ताटात जेवल्ये असत्ये व प्रेमाने आणि लाडिकपणाने तुमच्या तोंडात घास भरविला असता. खरेच मी का बरे वाढल्ये, का मोठी झाल्ये आणि मला मोठी होताच तुम्ही का बरे मला घरातून काढून दिलेत ? तुम्हाला माझा कंटाळा आला होता ? आई-बाबा लहानपणी गेले. आजोबा ! तुम्हीच माझे सारे केलेत. किती दिवस या पोरीचे करावयाचे ! झाली आता मोठी, जाऊ द्या सासरी, असे का तुमच्या मनात आले ? आजोबा ! मी मोठी झाल्ये तरी तुमची सेवा केली असती. तुमचा सदरा मी धुतला असता. तुमचे पाणी पिण्याचे भांडे मी लख्ख घासून ठेवले असते. परंतु तुमच्या उबेला राहिल्ये असत्ये. येथे माझा जीव गुदमरतो. येथे मी मेल्यासारखी जगत्ये. आजोबा ! परंतु हे सारे तुम्हाला का लिहू ? तुमचे हृदय का पोळू ? पण तुम्हाला न लिहू तर कोणाला लिहू ? कोणाजवळ मन मोकळे करु ? कोण आहे मायेचे तुमच्या या लाडक्या माणकला ? एक तुम्ही, तुम्ही, तुम्ही !'

अशा अर्थाची पत्रे ती असावयाची. माणकला साधारण लिहिता वाचता येत असे; परंतु पत्र भराभर तिला लिहिता आले नसते. कसा तरी वेळ काढून पत्र लिहावयाचे. मी लहान होतो तरी भरभर लिहीत असे. लहानपणी पहाटे उठून कित्ते गिरविल्यामुळे माझे अक्षरही ब-यापैकी होते.

माणकला एखादे वेळेस घरात पेरुच्या दोन फोडी मिळाल्या तर ती ह्या बाल मित्राला विसरत नसे. या पत्र-लेखकास ती त्या आणून द्यावयाची. माणक मला एक सूचना नेहमी द्यावयाची, 'श्याम ! मी तुझ्याजवळ सांगत्ये, हे कोणाजवळ सांगू नकोस हो ! कोणाजवळ बोलू नकोस हो !' आज माणक जिवंत नाही. तिचे कष्टमय जीवन फार दिवस राहणे शक्यच नव्हते. मी त्या वेळेला पुण्यास नव्हतो. कारण माणकला आधार द्यावयास श्याम पुण्यास फार दिवस राहिलाच नाही. पुण्याहून लौकरच तो कोकणात जावयाचा होता. कोकणातच त्याची आणखी चार वर्षे जावयाची होती. माणकच्या त्या हालअपेष्टा आज मी माझ्या हृदयातून बाहेर प्रकट केल्या. भारतीय स्त्रियांची अजूनही कशी केविलवाणी स्थिती आहे, ते तुमच्या ध्यानात यावे म्हणून हे मी सांगितले. ज्या माणकने हे सारे सहन केले तिला शतश: भक्तिमय प्रणाम करण्यापलीकडे दुसरे मी काय करु ?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel