मला वाईट वाटले. असा तेजोभंग त्यांनी का करावा ? काय बोलतो हे तरी त्यांनी पाहिले पाहिजे होते. त्यांच्याच व्याख्यानामुळे माझी ती महत्त्वाकांक्षा जागृत झाली होती. रामायण, महाभारत, गीता, ज्ञानेश्वरी, यांवर झालेल्या व्याख्यानांमुळे मीही या गोष्टीस प्रवृत्त झालो. मी पुढे औंधला गेल्यावर तेथे शाकुंतलावर बोललो. परंतु माझे मनोरथ एक वर्षाने पूर्ण होणार होते.

मी दुसरा विषय घेतला. इतिहास वाचनापासून फायदे, हा विषय घेऊन मी बोललो. माझे ते पहिले भाषण होते. मी घाबरलो नाही. चांगल्या रीतीने बोललो. मी दापोलीस एकदाच बोललो. एकदा एक इंग्रजी भाषण पाठ करुन म्हटले. वादविवादोत्तेजक सभेतर्फे नाटयप्रवेश होत असत. माझ्या वर्गातील मुलांनी सत्त्वपरीक्षा, झुंझारराव वगैरे नाटकांतील काही प्रवेश बसवून शाळेत केले होते. अशा रीतीने मुलांचा विकास होत होता.

शाळेत कधी कधी महत्त्वाच्या राष्ट्रीय प्रसंगांच्याही सभा होत असत. दापोलीच्या शाळेत अशी एकच सभा माझ्या स्मरणात आहे. १९१५ च्या फेब्रुवारी महिन्यात भारतसेवक गोपाळ कृष्ण गोखले दिवंगत झाले ! महाराष्ट्रातील एक थोर विभूती ते होऊन गेले. आमच्या शाळेत शोकप्रदर्शक सभा भरली होती. लोकमान्य टिळकांचे नाव आम्ही मराठी शाळेपासून ऐकले होते. कारण १९०८ सालात खेडयापाडयातील मुष्टिफंड, पैसाफंड, स्वदेशीमंडळे वगैरे गोष्टी सुरु झाल्या होत्या. लोकमान्य टिळक व केसरी यांचे ते महत् कार्य होते. गोपाळ कृष्णांचे नाव मोठमोठया शहरांत विख्यात होते.

आमच्या तात्यांकडे केसरी येत असे. टिळक व गोखले यांचे ते वाद मी वाचीत असे. 'आपल्याही दोघांच्या गोव-या ओंकारेश्वरावर गेल्याच आहेत.' अशा अर्थाचे वाक्य गोखल्यांवर टीका करतांना टिळकांनी लिहिले होते. ते त्या दिवशी मला आठवत होते. गोखले मेल्याची वार्ता कळल्यावर आम्ही मुलांनी त्या वाक्यावर चर्चा केली होती. कधी राधारमण हे दुखवटयाच्या सभेच्या दिवशी मुख्य वक्ते होते. आम्ही चित्रकलागृहात गंभीरपणे जमलो होतो. त्या दिवशी राधारमण कवींनी काय सांगितले, ते सारे मला आठवत नाही; परंतु ते म्हणाले, 'गोपाळ कृष्ण खरोखरच गोपाळ-कृष्ण होते. ते नेहमी तुमच्या हातात आहेतच. सर्व विद्यार्थ्यांच्या हातात ते असतात. गोपाळ कृष्णांचे अंकगणित तुमच्याजवळ सदैव आहेच. गोपाळ कृष्ण तुमच्या पिशवीत आहेतच; तुमच्या पुस्तकांच्या कपाटात आहेत, तुमच्या हातात आहेत; परंतु आता ते तुमच्या हृदयात जावोत. राष्ट्राच्या हृदयात जाऊन बसण्याच्या योग्यतेच ते होते व तसे ते बसतील यात मला संशय नाही. गोपाळ कृष्ण मेले नाहीत. ते हृदयाहृदयांत आज नव्याने जिवंत झाले आहेत. कालपर्यंत ते तुम्हास माहीत नव्हते. जिवंत असताना तुम्हाला माहीत नव्हते. जवळ असून माहीत नव्हते. हजारो ठिकाणी सभा होतील व कोटयवधी लोकांच्या हृदयांत दिवंगत गोपाळ कृष्ण जिवंत होतील. त्यांची एक पार्थिव मूर्ती अमूर्त झाली; परंतु त्यांच्या कोटयवधी चिन्मयमूर्ती हृदयमंदिरांत स्थापन झाल्या आहेत. धन्य ते गोपाळ कृष्ण, धन्य महाराष्ट्र, धन्य हा भारत देश, धन्य हे कोकण, धन्य हा रत्नागिरी जिल्हा, धन्य हा जवळचा चिपळूण तालुका, जेथे हा महापुरुष जन्माला आला. आजच्या हीनदीन दशेतही, पारतंत्र्यातही अशी नररत्ने भारतमाता प्रसवते, यातच तिचा मोठेपणा आहे व तिच्या भाग्योदयाची स्पष्ट आशा आहे.' राधारमणांचे असे ते सुंदर शब्द श्याम कसा विसरेल ? कोणीही सहृदय मनुष्य कसा विसरेल ?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel