वेदपुरुष : आज केसरीप्रभावळींतील महान् मुत्सद्दी स्वाभिमानाला बगल देत आहेत. भिकार्‍या समोर तुच्छतेनें फेंकलेल्या तुकड्याला चघळण्यासाठीं ते उत्सुक झाले आहेत. एकीकडे लाठीमार होत असतांहि ते तुकडे लघळपणानें पटकन् उचलणार्‍यांचें कोडकौतुक करण्यांत ते तल्लीन झाले आहेत.

वसंत
: आणि पर्वतीवर खरोखरच का युनियन जॅक लावलें होतें ? तेथें का खरोखरच आरास केली होती ?

वेदपुरुष
: हो. त्यांत आश्चर्य कसलें ? ज्या पर्वतीवर दर्शनास जाण्यासाठीं हरिजनांना सत्याग्रह करावा लागला, ज्या सत्याग्रहांत सामील झालेल्या इतरहि स्पृश्यांना जेथें मार खावे लागले, अशा त्या सनातनी मंदिरावर युनियन जॅक न लागेल तरच आश्चर्य! अरे, पंधरा वर्षापूर्वी समर्थांच्या गादीवरचे महाराज शनवारवाड्यासमोर प्रिन्स ऑफ् वेल्स यांना शुभमंगल आशीर्वाद देण्यासाठी नव्हते का आले ? सनातनी धर्म गुलामगिरी ओळखीत नाहीं. तो सर्व वस्तूंच्या अतीत आहे. सनातनी धर्मांचें रक्षण करतां करतां आपसांत मारामारी होऊन परकी सत्तोचीं पाळेंमुळें दृढमूल झालीं तरी सनातनींना वाईट वाटणार नाहीं. युनियन जॅक लावून पर्वतीला वार्षिक देणगी मिळाली व पर्वतीवरचे चौघडे चालले कीं सनातनीधर्म जगला. सर्वत्र हीच मनोवृत्ति आहे. स्वातंत्र्याची खरी तहान कोणासहि नाहीं. क्षुद्र गोष्टींचें महत्त्व व क्षुद्र अहंकार हे तुमचे देव आहेत.

वसंता : यांनी आपल्या मंत्र्यांना राजीनामा द्यावयास कां लाविलें नाहीं?

वेदपुरुष : राजीनामा द्यावयास लाविलें असतें तर शेवटीं काँग्रेसच्याच धोरणाचा विजय झाला असें झालें असतें! म्हणून तर या मुत्सद्यांनीं हा सत्याग्रह पक्षातर्फे नाहीं असें जाहीर केलें.

वसंता : मग काँग्रेसचेहि कांहीं लोक या सत्याग्रहांत गेले असतील ?

वेदपुरुष : हो. कांहीं जाणारच. हे एकमेकांचे राजकारणी डाव आहेत. निवडणुकीचे डाव! आधीं गुलामांना राजकारण असतें तरी कोठें ? ज्या ज्या योगें राष्ट्राचें बळ वाढेल तें गुलामांचें खरें राजकारण असतें. परंतु तें खरें राजकारण बघतो कोण ? क्षुद्र मानापमानांची राजकारणें पुणें खेळत असतें व महाराष्ट्रांतील कांहीं बावळट शिष्ट त्या कारणाचा उदोउदो करतात! काँग्रेसचेहि कांहीं लोक लोकशाही पक्षाची कारवाई ओळखून आपलींहि कांहीं प्यादी घुसडतीलच! या मुत्सद्यांचा होतो आहे. खेळ व भोळ्या धार्मिकांचा लाठीखालीं जात आहे प्राण !

वसंता : मग एकंदरींत हा सत्याग्रह सत्यस्वरूपी नाहीं तर ?

वेदपुरुष : कांहीं लोक यांच्यांत प्रामाणिकपणेंहि पडले आहेत. परंतु ते कोणते लोक ? ज्यांना लिहितां वाचतां येत नाहीं, ज्यांना राजकारणें कळत नाहींत, असे भोळेभाबडे लोक. परंतु सत्याग्रहाचे आरंभ करणारे आहेत कारस्थानी. त्यांना वाटलें कॉग्रेसचे लोक यांत पडणार नाहींत! परंतु नागरिकत्वाच्या हक्कांची पायमल्ली असें तत्त्व उचलून तेहि कांहीं यांत पडलेच. म्हणून कारस्थानी लोकांच्या दृष्टीनें हा सत्याग्रह एक प्रकारें फुकट गेला. पुढच्या निवडणुकींत याचा कोणालाच फारसा उपयोग करतां येणार नाहीं.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel