वेदपुरुष : तीनशें वर्षांनी हिंदु धर्माचे तारक समजून त्यांच्या भक्तीनें पालख्या उचलतील. तुम्हां सनातनींचे हें कुलपरंपरागत व्रत आहे. संत जिवंत असतांना त्याची विटंबना करायची आणि तो मेल्यावर त्याच्या नांवानें टाळ कुटायचे !
स्टेशन आलें. लहानसें स्टेशन. त्या पहा तीनचार भिल्लांच्या बाया चढूं पहात आहेत. यांच्याबरोबर मुलें आहेत. घाबरल्या बिचार्या ! रानांत वाघाला न भिणार्या त्या बाया गाडींतील झब्बूंना भीत होत्या.
वसंताने डबा उघडला. ''या इकडे या. द्या तुमचीं मुलें.'' वसंता मुलांना वर घेत होता. त्यांचें सामान त्यानें वर घेतलें. बाया चढल्या. शिट्टी झाली. गाडी निघाली.
वसंता : शेटजी, जरा जागा द्या.
शेटजी : तिकडे संडासाकडे बसव त्यांना. घाण सारी.
वकील : या रानवटांना आंत घेण्यास तुम्हांस कोणीं सांगितलें होतें ? नसतें उपद्व्याप! मोठे उपकारकर्ते !
वेदपुरुष : शिव्या मागून द्या. आधीं जागा करून द्या.
व्यापारी : पठाणाला असें म्हटलें असतेंत का ?
वसंता : आणि पठाणास तुम्ही संडासाजवळ बस म्हणून म्हटलें असतेंत कां! आपल्या भाऊबंदांना छळणारे आहांत तुम्ही. धर्माच्या गप्पा मारतां.
वकील : या रानटी अस्वलांना तिकडे बसव.
एक बाई : भाऊ आम्ही तिकडे बसतों. राहूं दे.
वसंता : येथें वर बसा. या.
व्यापारी : अरे त्यांना तुझा का त्रास ? बसूं देत तेथें.
वसंता : त्या अस्वली, आणि तुम्ही कोण लांडगे !
वकील : तें तुम्हां गांधीच्या लोकांना कळणार नाहीं. तुम्हांला शिक्षण नको, विद्या नको, कला नको. तुम्हांला श्रेष्ठांची संस्कृति काय कळणार ?
वसंता : हातांत टाइम्स घेतला म्हणजे मनुष्य एकदम सुधारतो वाटतें ? सुधारणेची तुमची व्याख्या तरी काय ? इस्तरीचे कपडे घालतो, इंग्रजी बोलतो, साहेबांशीं हात हालवतो, चहा पितो, चिरूट ओढतो, बोलपट बघतो, रेडियो ऐकतो, व्याख्यानें देतो, म्हणजे का सुधारलेला ?