तिसरा : चार वाजेपर्यंत का हें प्रेत ताटकळत ठेवायचें ?

पहिला : मग सहा वाजतां मुंबईकडील गाडी येते, त्या वेळेपर्यंत तरी ठेवावें. कदाचित् ह्याची बायको मुंबईहून येईल. तार दिली आहे.

दुसरा : प्रेत ठेवण्यांत काय अर्थ आहे ?

पहिला : भावासाठीं ठेवतां, मग पत्नीसाठीं कां नको ? भावाच्या प्राणांपेक्षां ज्याला बोर्डाची निवडणूक महत्वाची वाटते, त्याच्यासाठीं तुम्ही वाट पाहतां. मग जिंचे सर्वस्व म्हणजे पति, ती कदाचित् येईल, तिच्यासाठींहि थोडा वेळ थांबा. स्त्रियांच्या भावना म्हणजे का कचरा ?

दुसरा : अहो, त्यांना आत्मा नसतो असें उपासनी बाबा म्हणतात ?

तिसरा : आत्मा नसलेल्या स्त्रीच्या पोटांतून बाहेर येणार्‍याला तरी आत्मा आहे का ? यांचीं तोंडें आहेत कीं तोबरे आहेत ?

दुसरा : महान् संतांबद्दल असें बोलूं नये.

पहिला : हे असले संत नसून जंत आहेत झालें !

दुसरा : तुमच्या गांधींबद्दल असें म्हटलें तर ?

पहिला : तुमची मनोदेवता असें म्हणावयास सांगेल तर म्हणा. आम्ही म्हणतो म्हणून तुम्हीं म्हणायचें अशांत काय अर्थ आहे ? खर्‍या  संताला सारे वंदनच करितील .

एकजण : जाऊं द्या वाद. ते पहा बोर्डवाले भाऊ आले.

दुसरा : करा तयारी. आंवळा दोर्‍या. नीट करकचून बांधा.

पहिला : तिकडे गेलास नी भाऊ मेला.

भाऊ : यश येईलसें वाटत नाहीं. काँग्रेसचा फार जोर आहे. जेथें तेथें ही काँग्रेस आडवी येते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel