तो मुलगा म्हणाला, 'अजून नाही.'

हिरी म्हणाली, 'दिसतो भिकारडा, परंतु बोलतो तर छान.'
सखू म्हणाली, 'चल बाळ, तुला आईकडे पोचविते. उद्या पायातील काटे काढीन. आता झोप. चल.'

सखू त्या मूलाचा हात धरून निघाली, तो पाऊस थांबला. आकाश निवळले. ढग गेले. आकाशातील लाखो तारे चमचम करू लागले. सारे गाव धुवून निघाले. वारे थांबले. लोकांनी दिवे लावले. हजारो पणत्या घरांसमोर चमकू लागल्या. आकाशात तारे व खाली हजारो दिवे. दिवाळी आली असे वाटू लागले. हिरी, माणकी, रुपी यांनी बाहेर पणत्या लावल्या. कशा दिसत होत्या त्यांच्या ज्योती! शांत, शीतल, सौम्य प्रकाश.

हिरी म्हणाली, 'या ज्योती हिर्‍यांप्रमाणं चमकत आहेत.'

माणकी म्हणाली, 'माणिकमोत्यांप्रमाणं तळपत आहेत.'

रुपी म्हणाली, 'सोन्यारुप्याप्रमाणं झळकत आहेत.'

सखू म्हणाली असती, 'निर्मळ प्रेमानं झळकत आहेत.'

या तिन्ही मुलींचे आईबाप घरी येण्यास निघाले. त्यांची गाडी येत होती. इतक्यात गावातील सारी लहान-थोर मंडळी, स्त्रीपुरूष, मुलेबाळे, सारी 'माळ आली, माळ आळी; सुगंध आला; कुठं तरी माळ आली; त्या बाजूनं घमघमाट येतो आहे तिकडे चला.' असे म्हणत धावत-पळत त्या श्रीमंताच्या घराकडे येत होती. त्या जमीनदाराची गाडी कशीबशी घराशी आली. गाडी सोडण्यात आली. बैल बांधण्यात आले. तो श्रीमंत मनुष्य तेथे उभा राहिला. त्याच्या मुली घरातून धावत आल्या. त्या आईबापांस भेटल्या. घरासमोर तुफान गर्दी. वास तर येत होता; परंतु माळ कोठे आहे? ती का आकाशातून खाली येण्यासाठी निघाली होती? हा सुगंध का पुढे आला?

सखू त्या मुलाला घरी निजवून परत येत होती. आपल्या धन्याकडे येत होती, तो अपरंपार गर्दी. कशी तरी ती धन्याच्या घराच्या ओटयावर चढली. इतक्यात त्या तिन्ही बहिणी आश्चर्याने म्हणाल्या, 'अग अग सखू, अग तुझ्या गळयात माळ! ही बघ माळ. स्वर्गातील माळ तुझ्या गळयात! तिचाच हा घमघमाट! सखूच्या गळयात माळ!'

लोक ओरडले, 'काय, सखूच्या गळयात माळ? एका मोलकरणीच्या पोरीच्या गळयात? हा सर्व गावाचा अपमान आहे.'

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel