परंतु मोठया भावाची व आईची त्यांना आठवण येत होती का? गोपाळ मनात म्हणे, 'आपल्या आईला आता काही कमी पडणार नाही, कशाची ददात भासणार नाही. आईचं नष्टचर्य आता संपेल, ती सुखानं नांदेल. ती चांगली लुगडी नेसेल, दान-धर्म करील. तीर्थ-यात्रा करील. आईच्या हातांना आता भांडी घासायला नकोत, दळण दळायला नको. धुण्याच्या मोटा धुवायला नकोत.'

परंतु जगाची रीत निराळीच असते हे गोपाळला काय माहीत?

'बायकोला पीतांबर घाटी! आईच्या लुगडयाला सतरा गाठी!!'

हे वचन खरे असेल असे त्याला वाटत नव्हते. हळुहळू सारे त्याला कळू लागले. भावांनी आपले वैभव पाहावयास आईला नेले नाही. सहा-सहा महिन्यांत घरी बोटभर पत्रही पाठवीत नसत की चार पैसे धाडीत नसत!
गरीब बिचारा गोपाळ! त्याने आता मिलमध्ये नोकरी धरली. सूर्यनारायणाचे किरण पृथ्वीवर पसरू लागत व मिलचा काळाकुट्ट धूर शहरावर पसरू लागे. सकाळ होताच हजारो लोक त्या मिलरूपी राक्षसाच्या तोंडात जात व सायंकाळी पांढरे फटफटीत होऊन बाहेर पडत. गोपाळही अगतिक होऊन त्या काळया बकासुराच्या घरात जाऊ लागला. त्याला दहा-वीस रूपये मिळत. तो पहाटे चार वाजता उठे. स्नानसंध्या व पूजा करी. आईसाठी पाणी भरून ठेवी. भाकर करी व थोडी खाऊन बाकीची बरोबर बांधून नेई. सायंकाळी सहा वाजता दमून भागून तो घरी येई. झाड-लोट करी. पाणी उदक पाही. रात्री जेवण झाल्यावर तो आईला भक्तीविजय वगैंरे वाचून  दाखवीत असे. आईचे पाय चेपी व आईला झोप लागली आहे असे पाहून मग तो स्वत: अंथरूणावर पडे.

परंतु त्याच्या आईला कोठली झोप यायला? आधीच म्हातार्‍या माणसांना झोप कमी, त्यातून गोपाळच्या आईला किती चिंता व काळज्या! ती डोळे मिटून स्वस्थ पडे; गोपाळला वाटे की, आईला झोपच लागली. गोपाळला अंथरूणावर झोप लागली म्हणजे त्याची आई उठे व गोपाळजवळ जाऊन त्याच्या डोक्यावरून हात फिरवी. त्याच्या कल्याणार्थ ती माउली देवाची आळवणी करी व आपल्या खोल गेलेल्या डोळयांतून रात्रीच्या शांत समयी चार टिपे काढी.

असे कष्टमय, परंतु आईच्या सेवेने व सान्निध्याने आनंदमय वाटणारे जीवन गोपाळ कंठीत होता. एखादे वेळेस गोपाळने वामन किंवा हरी हयांच्याकडे जर चार पैसे मागितले, तर ते लिहीत, 'तुम्हाला रे कसला खर्च? आम्हाला येथे गडी-माणसं, गाडया-घोडी, कपडे-लत्ते, मुलं-बाळं, किती खर्च. घराचं भाडंच 50 रूपये होतं! आम्हाला पैसे पुरत नाहीत, गडी-माणसांस उरत नाहीत, तर तुम्हाला कोठून पाठवू? पंचवीस रूपये तुला मिळतात, ते का दोन जीवांना पुरत नाहीत? तूच ५-१० रूपये आम्हाला पाठव. पुष्कळ साठवून ठेवले असशील! लग्न तर केलं नाहीसच. आई एकदाच खात असेल. ५-१० रूपयांत तुमचं भागत असेल.' अशी आलेली उत्तरे गोपाळ आईला वाचून दाखवीत नसे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel