रामजीच्या घरात धान्याची कोठारे भरलेली होती; परंतु कोण खाणार ते धान्य? तिकडे मोहनला उन्हातान्हात राबावे लागत होते. मेहनतीने भाकर मिळवावी लागत होती. जाईचा जीव खालीवर होई.

मोहन आपल्या वडिलांच्या घरावरून चुकूनही जात नसे. न जाणो, पित्याच्या वैभवाची, त्या घरादाराची, शेतीवाडीची इच्छा मनात उत्पन्न व्हावयाची. त्या बाजूने जाणेच नको. तसेच, स्वत:चा कृश झालेला देह जाईच्या दृष्टीस पडू नये म्हणूनही तो त्या बाजूने जात नसे. रामजी ओटीवर बसलेला असे. आपला मुलगा एक दिवस घरी परत येईल असे का त्याला वाटत होते?

मोहनला श्रमाची सवय नव्हती. एकाएकी खूप श्रम त्याला पडू लागले. मनात दुसरीही दु:खे असतील. तो अशक्त दिसे. गजरी बाळंत झाली होती. तिला आता कामाला जाता येत नसे. मोहनला घरचे करावे लागे, पुन्हा कामावर जावे लागे. तो अगदी थकून जाई.

एके दिवशी फारच दमून-भागून मोहन घरी आला. घरी आल्यावर तो आपल्या लहान मुलाला घेऊन खेळवीत होता. त्या मुलाचे हसे पाहून तो सारे श्रम विसरला; परंतु एकाएकी घेरी येईल असे त्याला वाटले. त्याने बाळ खाली ठेवला. तो पडला. गजरी धावत आली. तिने त्याला सावध केले. अंथरूणावर निजवले. मोहनच्या अंगात सपाटून ताप भरला. गजरी घाबरली. गरिबाला कोठले डॉक्टर? गजरी रडत बसली. मोहन म्हणाला, 'रडू नकोस. तू रडलीस म्हणजे मला वाईट वाटतं. माझ्याजवळ बस. बाळाला घेऊन बस. त्यात मला समाधान आहे.'

मोहनचे दुखणे हटेना. त्याला कामावर जाता येइना. घरात खाण्यापिण्याची पंचाईत पडू लागली. जाईच्या कानांवर या गोष्टी गेल्या. रामजीला न कळत ती मोहनच्या बायकोकडे मदत पाठवी. कधी दूध, कधी फळे, कधी काही ती पाठवू लागली. मोहन मरणाच्या दारात होता. त्याला भेटण्यासाठी जाईचा जीव तडफडत होता; परंतु ती जाऊ शकली नाही. तिची व मोहनची भेट हया जगात जणू पुन्हा व्हावयाची नव्हती. मोहन मरण पावला!

गजरीच्या दु:खाला अंतपार राहिला नाही. तिला कोणाचा आधार? माहेरचे मायेचे तिला कोणी नव्हते आणि सासर असून नसल्यासारखे. आपल्या चिमण्या बाळाला जवळ घेऊन ती रडत बसे; परंतु गरिबाला रडण्याला तरी कोठे पुरेसा वेळ आहे? गरीब मनुष्य काम करील तेव्हा खाईल! परंतु गजरी कामाला तरी कशी जाणारा? लहान मुलाला कोठे ठेवणार? त्याला पाठीशी बांधून कामावर गेली असती, परंतु बाळाच्या जिवाला बरेवाईट होईल असे तिला वाटे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel