लिली 'मन्या! मन्या!' करीत देवाघरी निघून गेली. लिली मेली. मन्याने गुराख्यांना विचारले, 'ते कोणाचे रे प्रेत येत आहे?' ते म्हणाले, 'लिलीचे.' मन्या चमकला. कसे तरी पाहू लागला. त्या झाडाखाली तो उभा राहिला. लिलीची चिता धाडधाड पेटत होती. मन्याचे हृदय ताड-ताड उडत होते, जणू फुटू पाहात होते.

सारे लोक माघारे गेले. मग मन्या हातात ती आपली बासरी घेऊन तेथे गेला. त्या चितेजवळ तो बसला. रसरशीत निखारे तेथे होते. लिली व मन्या हयांच्या मनोरथांचे जळून असेच निखारे झाले होते. मन्या तेथेच बसला. तो मध्येच हात जोडी, मध्येच रडे, मध्येच उठून त्या चितेला प्रदक्षिणा घली.

मन्या पुन्हा गुराख्यांना तेथे दिसला नाही. मन्या कोठे गेला? मन्याचा पत्ता नाही. त्याची बासरी - जी लिलीने मागितली होती ती - लिलीच्या विझलेल्या चितेवर सापडली! परंतु ती बासरी वाजविणारा सापडला नाही. तो कोठे गेला? वार्‍याला माहीत, वरच्या तार्‍यांना माहीत, त्या वाहाणार्‍या खोल नदीला माहीत!

त्या नदीतीरी रात्र पडली की गोड बासरी ऐकू येते. दोन निरनिराळया तर्‍हेचे सूर ऐकू येतात. गुराख्यांनी ते संगीत ऐकले व गावात सांगितले. लिलीचा बाप व मन्याचा बाप दोघे एके दिवशी रात्री तेथे गेले. ते दिव्य संगीत त्यांच्या कानी पडत होते. त्यांची दगडासारखी हृदये मृदू नवनीताप्रमाणे होत होती. बासरीच्या एकेका सुराबरोबर त्यांच्या ह्दयाचे पाणी-पाणी होत होते; फत्तरांची फुले होत होती. मन्या व लिली ह्यांच्या जगण्याने जे झाले नाही, ते त्यांच्या मरणाने झाले.
मन्याचा बाप विरक्त झाला. सारी खते पत्रे त्याने फाडून टाकली. त्याने सर्वांना देणे माफ केले. होता नव्हता तो पैसा गोरगरिबांच्या हितार्थ त्याने खर्च केला. तो झोपडीत राहू लागला. बंगले, मळे, गाडया, घोडी सारे विकून कोठे त्याने विहिरी बांधल्या, कोठे दवाखाना घातला, कोठे शाळा उघडली, कोठे खेडयातील रस्ते दुरूस्त केले. मन्याचा बाप जणू खरे जीवन जगू लागला. मन्या मेला; परंतु पित्याचा पुनर्जन्म झाला.

धोंडोपंताने नदीतीरी एक सुंदर समाधी बांधली. ती मन्याची बासरी तेथे ठेवण्यात आली. 'मन्या व लिली' एवढे दोनच शब्द त्या समाधीवर लिहिलेले आहेत. येणार्‍या-जाणार्‍या मुशाफिरांना गुराखी ती जुनी गोष्ट सांगतात! मग ते ऐकणारे मन्या व लिलीचे अश्रू देऊन श्राध्द करतात!

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel