आकाशातसुध्दा ढग आले. सूर्याला त्यांनी झाकाळून टाकले. नावेतील लहान मुलांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून जणू ते ढग आले होते. आयाबायांना बरे वाटले; परंतु एकदम जोराचा वारा सुटला. काळे काळे प्रचंड ढगावर ढग जमू लागले. वादळाची चिन्हे दिसू लागली. नदीच्या प्रवाहावर प्रचंड लाटा उसळू लागल्या; नाव नाचू लागली, डोलू लागली. लोकांना भय वाटू लागले. आयांनी मुलांना पोटाशी धरले. 'काय आम्ही पाप केले म्हणून हे वादळ आले-' असे कोणी बोलू लागले.

आकाश-प्रसन्न आकाश-सारे काळवंडून गेले. थोडया वेळापूर्वी किती निरभ्र व स्वच्छ होते. कोणाला सांगितले तर खरेसुध्दा वाटणार नाही. निसर्ग लहरी आहे. निसर्गाचा अंश मनुष्यप्राणी, तोही लहरी आहे. क्षणापूर्वी गदाधरांचे तोंड किती प्रसन्न होते! परंतु त्यांचे तोंडही पाहा किती काळवंडले आहे! त्यांच्याही हृदयाकाशातील सूर्य लोपला आहे व ढग जमा झाले आहेत. काय बरे कारण झाले?

चैतन्य: गदाधर, काय होत आहे? एकाएकी ग्रंथ का मिटून टाकलास? तुझं काही दुखतं का? का घरची शोकाची एखादी आठवण झाली? सांग, काय झालं ते मला सांग. एकाएकी बाहेर वादळ होत आहे, तुलाही एकाएकी काय झालं?

परंतु गदाधर काही बोलत ना. त्यांच्या डोळयांतून ते का दोन अश्रू आले? तोंड फिरवून त्यांनी डोळे पुसले. चैतन्यांकडे क्षणभर त्यांनी पाहिले, परंतु त्यांना पाहावेना. त्यांची दृष्टी खाली झाली व पुन्हा भरून आली. चैतन्यांचे हात त्यांनी आपल्या हातात घेतले व त्या निर्मल हातांवर गदाधरांच्या डोळयांतील पाणी पडले. चैतन्य चमकले व दु:खी झाले.

चैतन्य: गदाधर, आज इतक्या वर्षांनी आपण भेटत आहोत. तुझं दु:ख मला का सांगत नाहीस? गुरूगृही असताना तू तुझं सुख-दु:ख मला नेहमी सांगत असस. तुझं पोट दुखलं तर मी तेल चोळीत असे व ते राहात असे. लहानपणापेक्षा आज मी निराळा का आहे? सुखदु:खाच्या गोष्टी सांगावयास त्या वेळी मी योग्य होतो व आज अयोग्य का झालो? गदाधर, तुझे अश्रू लहानपणच्याप्रमाणे आज मोठेपणीही मला पुसू दे. तुझं दु:ख शक्य तर दूर करू दे. जगात एकमेकांचं दु:ख थोडं-फार हलकं करणं हयाहून थोर काय आहे? असे शेकडो ग्रंथ लिहिण्यापेक्षा एखाद्याचे अश्रू पुसणं व त्याचं दु:ख दूर करणं हे थोर आहे असे कधी कधी मला वाटत असतं; परंतु पांडित्य मिरविण्याची, कीर्ती मिळविण्याची आसक्ती मला अद्याप सुटत नाही. मोहच हे. हे जिंकणं कठीण आहे आणि म्हणूनच त्यांना जिंकून घेण्यात पुरूषार्थ आहे; परंतु जाऊ दे. तुझं दु:ख समजून घ्यावयाचं, ते सोडून मी प्रवचन देत बसलो. सांग गदा, तुझं दु:ख सांग. आपला मित्र आपणाजवळ दु:ख सांगत नाही हयाहून दुर्दैव कोणतं, दुर्भाग्य कोणतं? कशाचं दु:ख तुला होत आहे? सांग.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel