ते शहर फार सुंदर होते. पृथ्वीवरचा तो स्वर्ग होता, असे लोक म्हणत. रात्री विजेची रोषणाई झाली म्हणजे फारच मनोहर देखावा असे. डांबराचे रस्ते होते. सुंदर उपवने होती. त्या शहरात मोठमोठी नाटकगृहे होती. मोठमोठी ग्रंथालये होती. सायंकाळची वेळ झाली. म्हणजे मोटारींतून सुंदर पोषाख करून नरनारी जात असत. जगात कोठे दु:ख असेल असे त्या फुलपाखरांना पाहून मनात कधी येणे शक्य नव्हते.

परंतु स्वर्गाजवळच नरक असतो. कमळाजवळ चिखल असतो, फुलाजवळ कीड असते, जीवनाजवळ मरण असते, प्रकाशाजवळ अंधार असतो, स्वातंत्र्याजवळ दास्य असते, वैभवाजवळ विपत्ती असते, आलापांजवळ विलाप असतात, सुखाशेजारी दु:ख असते, हास्याच्या जवळ अश्रू असतात. त्या सुंदर, सुखी शहरात अपरंपार दु:खही होते.

त्या शहरात एक भली मोठी धर्मशाळा होती. त्या धर्मशाळेच्या आवारात एक मोठा विस्तृत तलाव होता. दिवसभर शहरात भीक मागणारे लोक रात्री ह्या धर्मशाळेत येऊन राहात असत. कोणी कण्हत, कोणी कुंथत; कोणी रडत, कोणी ओरडत; कोणाला रोग होते, कोणाला काही होते; कोणाला शारीरिक वेदना, कोणाला मानसिक. पृथ्वीवरचा तो नरक होता.

त्या भिकार्‍यांत लहान होते, थोर होते; स्त्रिया, पुरूष, मुले - सारे प्रकार होते. धर्मा एका भिकार्‍याचाच मुलगा होता. मानमोडीच्या साथीत त्याचा बाप त्याला सोडून गेला होता. भिकेची झोळी मुलाला देऊन तो निघून गेला. धर्माला वाईट वाटले. भिकार्‍यालाही हृदय असते, प्रेम असते, सारे असते. बाप मेला त्या दिवशी धर्मा वेडयासारखा झाला होता. बापाचा देह ना पुरता येई, ना जाळता येई. पित्याच्या प्रेताजवळ तो रडत बसला. बाकीचे भिकारी जगण्यासाठी भीक मागावयास गेले. शेवटी म्युनिसिपालिटीचा खटारा आला व तो मुडदा गाडीतून नेण्यात आला. मेलेली कुत्री, मेलेली मांजरे, मेलेले उंदीर, मेलेले पक्षी त्या गाडीतूनच नेण्यात येत असत.

धर्मा त्या गाडीच्या पाठोपाठ रडत-रडत गेला. पित्याला पुरण्यात आले. धर्मा रडून माघारा आला. दु:ख कमी झाले. दिवस जात होते. अधूनमधून त्या पित्याला पुरल्याच्या ठिकाणी तो जाई व फुले वाही. अश्रू ढाळी. बापाचे एक फाटके वस्त्र त्याने जवळ ठेवले होते. जणू ते पितृहृदय, प्रितृप्रेम त्याने बाळगले होते. रात्री ते फाटके तुटके वस्त्र त्याला पुरे. त्याच्याजवळ पांघरावयास दुसरे काय होते? गरिबाला थंडी वाजतच नाही. श्रीमंतांची थंडी जगातील सारे गरम कपडे घालूनही राहात नाही. ते पित्याचे प्रेमळ वस्त्र धर्माला भरपूर ऊब देई.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel