चैतन्य: गदाधर, तुझं कसं काय चाललं आहे? आपण शिकत होतो तोपर्यंत मौज होती. त्या वेळेस पाखरांप्रमाणं आपण निश्चिंत होतो; परंतु शिरावर संसाराची जबाबदारी पडली का जीव गुदमरू लागतो. तू हल्ली काय करतोस? संसाराची दगदग फार नाही ना होत?

गदाधर: चैतन्य, माझं चांगलं चाललं आहे. अध्ययन व अध्यापन हयांत वेळ जातो. घरी काही मुलं शिकवण्यासाठी राहिली आहेत. त्यांना मी शिकवितो. एक श्रीमंत जमीनदार त्यांचा खर्च चालवितो. आनंदात आयुष्य जात आहे. कधी कधी मागच्या आठवणी येतात. गुरूगृही असताना आपण दोघे एकदा भांडलो होतो, ती मजा मी मुलांना किती तरी वेळा सांगतो. चैतन्य, आपण भांडत असू. परंतु किती चट्कन भांडण विसरून जात असू. जी भांडणं मनुष्य विसरून जातो त्या भांडणांत आनंदच असतो, नाही?

चैतन्य: गदाधर, परंतु जग भांडणं विसरण्यास तयार नसतं. पुन:पुन्हा भांडणं उकरून काढण्यास जग तयार असतं. विचित्र आहे हे जग! गदाधर, आपण विद्यार्थी असताना किती मनोरथ रचीत असू, मनात किती मांडे खात असू! तुला आठवतं का सारं?

गदाधर
: हो का आठवणार नाही? एके दिवशी तू गुरूजींना म्हणालास, 'मी न्यायशास्त्रावर असा ग्रंथ लिहीन की सारं जग त्याला डोक्यावर घेऊन नाचेल!' गुरूजींनी तुला आशीर्वादही दिला होता.

चैतन्य: गदाधर, लहानपणाचा तो निश्चय मी पार पाडीत आहे. न्यायशास्त्रावर मी ग्रंथ लिहीत आहे व तो जवळ-जवळ पूर्ण होत आला आहे. गदाधर, तो ग्रंथ पाहून तुला आनंद वाटेल.

गदाधर: कोठे आहे तो ग्रंथ? तू बरोबर आणला आहेस का?

चैतन्य: हो. आणला आहे.

असे म्हणून चैतन्यांनी पिशवीतून तो हस्तलिखित ग्रंथ काढला. सुंदर कपडयात तो गुंडाळलेला होता. अत्यंत काळजीपूर्वक लिहिलेला होता. चैतन्यांनी गदाधरांच्या हातात तो ग्रंथ दिला. गदाधरांनी ग्रंथ घेतला व ते वाचू लागले. चैतन्यांचे अक्षर मोत्यांसारखे होते. पानांमागून पाने गदाधर वाचीत होते. जसजसे ते वाचू लागले तसतसे त्यांचे तोंड खिन्न होऊ लागले. त्यांच्याने तो ग्रंथ पुढे वाचवेना. त्यांनी तो गुंडाळून ठेवला. क्षणभराने त्यांनी तो चैतन्यांच्या हातात दिला. गदाधर काही बोलेनात. एक दिर्घ सुस्कारा मात्र त्यांनी सोडला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel