सायंकाळ झाली. मुले घरोघर गेली. गोपाळ व त्याचे पंतोजी निघाले. पंतोजींनी वाटेत पुन्हा विचारले, 'गोपाळ, खरचं कोणी दिलं रे गाडगं?' गोपाळ म्हणाला, 'खरंच म्हणजे? मी का कधी खोटं सांगतो? आई सांगते, नेहमी खरं बोलावं. खोटं बोललो तर आईला वाईट वाटेल. खरंच दादानं दिलं ते.' पंतोजींनी विचारले, 'तो कोठे राहातो?' गोपाळ म्हणाला, 'त्या राईत. ओढयाकाठच्या जंगलात. तेथे गाई चारतो. त्याला घरी यायला वेळ नसतो. त्याला फार काम. मला भीती वाटे म्हणून मी आईला सांगितलं. आई म्हणाली, 'त्या रानात तुझा दादा आहे त्याला हाक मार.' मी हाक मारली तर खरंच आला. रोज माझ्याबरोबर येतो. त्यानंच दिलं गाडगं. आईजवळ काही नव्हतं. ती म्हणाली, 'जा, दादाजवळ माग.'

बोलत-बोलत दोघे जंगलाजवळ आले. गोपाळने 'दादा दादा, हे बघ पंतोजी तुला पाहायला आले आहेत. ये रे लवकर -' अशी हाक मारली; परंतु आज वेली हालल्या नाहीत, पाने सळसळली नाहीत. गोड तोंड डोकावले नाही. पंतोजी म्हणाले, 'गोपाळ! बर्‍याच गप्पा मारतोस. असे, हया जंगलात वाघ, लांडगे राहातात. कोठला दादा व कोठल्या गाई. खरं सांग कोणी दिलं गाडगं ते.'

गोपाळ कळवळून व रडकुंडीस येऊन म्हणाला, 'खरंच माझ्या दादानं दिलं. मला खोटा नका म्हणू. माझ्या आईला वाईट वाटेल.' गोपाळने पुन्हा दादाला हाक मारली व तो म्हणाला, 'दादा ये. आजच्या दिवस तरी ये. तुला मी रोज त्रास देतो म्हणून रागावलास होय? नको रागावू. उद्यापासून रोज नको येऊ. पंतोजी मला खोटा म्हणतात, म्हणून तरी ये. ये, दादा, ये. ये.'

दादा आला नाही; परंतु झाडांतून, त्या जंगलातून गंभीर आवाज ऐकू आला. पंतोजी कान टवकारून ऐकू लागले. काय होता तो आवाज? काय होती ती वाणी? ती वाणी पुढीलप्रमाणे होती--

'नाही, मी येणार नाही. तुझ्या आईची माझ्यावर जेवढी श्रध्दा आहे, तेवढी तुझ्या पंतोजींची नाही. ज्याचा भाव त्याचा देव. ज्याचे प्रेम, त्याचा मी.'

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel