व्याघ्ररूपी भगवंत म्हणाला, 'बरं आज परीक्षाच घेतो. जा, लौकर जाऊन ये. मी इथं या दगडावर बसून राहातो. तुझा बाळ भुकेला आहे; तशी माझी बाळेही भुकेली आहेत हे लक्षात ठेव.'

बहुलेला एकदम जवळ रस्ता दिसला. इतका वेळ तिला कसा दिसला नाही, कोणास ठाऊक! सन्मार्ग जवळच असतो; परंतु पुष्कळ वेळा तो माणसाला दिसत नाही. बहुला धावपळ करीत निघाली. पुत्रप्रेमाने तिच्या कासेला गळती लागली होती. तिचे ते चार सड म्हणजे जणू दूधाने भरलेले चार समुद्रच होते. पृथ्वीला, वाटेतील दगडधोंडयांना दुधाचा अभिषेक करीत ती चालली. पळताना तिला ठेचा लागत होत्या, काटे बोचत होते; परंतु तिचे कशाकडेही लक्ष नव्हते.

घरी डुब्याचा ओरडून ओरडून घसा बसला होता. आज कृष्णदेव आपल्याला आंजारागोंजारायला आला नाही, हयाचेही त्याला वाईट वाटले. गरीब बिचारा सारखा आईची वाट पाहात होता. ती पाहा हंबरत बहुला आली. डुबा हंबरला. बहुला डुब्याजवळ उभी राहिली. डुबा आईच्या कासेला झोंबला. तो तान्हा अपार पान्हा पिऊ लागला. आज बहुलेचा पान्हा संपता संपेना. डुब्याचे पोट भरता भरेना.

डुबा बहुलेचे दूध पीत होता. बहुला त्याचे अंग चाटत होती; परंतु एकाएकी डुबा चमकला. त्याचे दूध पिणे थांबले. आईच्या डोळयांतील कढत अश्रू त्याच्या अंगावर पडले. डुबा आईच्या तोंडाजवळ आला. आईच्या तोंडाला तोंड लावून डुबा रडत रडत म्हणाला, 'आई, का ग रडतेस? तुला काय झालं? तू कुणाच्या शेतात चुकून गेलीस होय? त्यानं तुला मारलं होय? हे तुझ्या अंगावर खरचटे उठले आहेत. काटेरी काठीनं तुला कुणी झोडपलं वाटतं?' बहुला म्हणाली, 'बाळ, मला कुणी मारलं नाही. तुझ्यासाठी पळत येत होत्ये. वाटेतील काटेझुडपे लागली व अंग खरचटलं.'

डुबा: मग तू का रडतेस? कृष्णदेव तुझ्यावर रागावला? आज मला खाजवायला तो आला नाही. तुला त्यानं इतर गाईंबरोबर का आणलं नाही? त्यांन तुला हाकलून दिलं होय? तुला इतका उशीर का झाला?

बहुला: कृष्णदेव माझ्यावर रागावला नाही. मीच त्याला सोडून दूर निघून गेल्ये.

डुबा: तू का निघून गेलीस? तू माझ्यावर रागावलीस वाटतं? दूध पिताना मी तुला ढुश्या देतो, म्हणून रागावलीस? मी तुझ्याबरोबर वनात येण्याचा हट्ट धरतो म्हणून रागावलीस? आई, मी हट्ट करणार नाही. तू वनात नेशील तेव्हाच येईन. आता मी गवत खाऊ लागलो आहे. पिताना तुला त्रास होत असेल तर मी दूध पिणार नाही, आई, माझ्यावर रागावू नको. मी का वाईट आहे?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel