श्रीमंतांच्या ताटांतील अन्न बालडया भरभरून खाली नेण्यात आल्या. लाडू, जिलब्या, भजी - सारे त्यात होते. भिकारी अस्वस्थ झाले. त्यांच्यांत चळवळ सुरू झाली. कोणी पुढे घुसू लागले. कोणी गरीब बापडे मागे सरकू लागले. नोकरांनी त्या बालडया दाराशी आणल्या. ज्याची वाट पाहात ते भक्त इतका वेळ उन्हात ताटकळत उभे होते, ते त्यांचे परब्रह्म बालडयांतून दिसू लागले.

पाखरांना ज्याप्रमाणे दाणे फेकतात, उज्जयिनीला क्षिप्रा नदीतील माशांना व कासवांना सरकारी नोकरांकडून कणकेचे गोळे जसे फेकण्यात येतात, त्याप्रमाणे ते नोकर अन्न फेकू लागले. ते घेण्यासाठी झोंबाझोंबी होऊ लागली. परातीत अन्न घेऊन नोकर उभा राहिला. भिकारी हात वर करू लागले. 'अरे, मला हात लागेल ना. दूर सरा.' असे तो सनातनी नोकर ओरडला. लाडू, जिलब्या, भजी त्यांच्या झोळयांत, त्यांच्या पदरात टाकण्याऐवजी तो फेकी. कोणी आडदांड भिकारी वरच्यावर झेलीत. जमिनीवर पडे ते वेचण्यासाठी मारामारी होई. नोकराचा खेळ चालला होता. तो त्या भिकार्‍यांना लढवीत होता. रेडयांच्या झुंजी, कोंबडयांच्या झुंजी संस्थानिक लावतात. हया श्रीमंतांच्या नोकराने भिकार्‍यांच्या झुंजी लावल्या.

धर्माला अद्याप काहीच मिळाले नव्हते. तो पुढे घुसे, परंतु पुन्हा मागे लोटला जाई. शेवटी होती नव्हती ती शक्ती एकवटून तो पुढे सरकला व एकदम त्याने हात वर केला. त्या नोकरच्या परातीला तो हात लागला! अब्रम्हण्यम्! तो सनातनी धर्मनिष्ठ नोकर खवळला. 'माजलीत तुम्ही भिकारडी. शिवलास ना मला. कोठे आहे तो पोरगा?' असे तो गरजला. 'हा पाहा, हा पाहा', असे म्हणून इतर भिकारी धर्माला पुढे आणू लागले. त्या नोकराने त्याचा हात धरला व त्याच्या दोन-चार थोबाडीत दिल्या. धर्मा खाली पडला. त्याच्या पोटावर त्या धार्मिक नोकराने - पापभीरू नोकराने - लाथ मारली! धर्माने केविलवाणी किंकाळी फोडली; परंतु त्याच वेळेस गाण्याची सुंदर प्लेट दिवाणखान्यात लागली होती; त्यामुळे ती किंकाळी वर कोणालाच ऐकू गेली नाही.

खरकटे वाटून झाले. 'दादा, आम्हाला नाही रे काही मिळालं. आम्ही जरा थांबतो. दुसर्‍या पंक्तीचं दे रे दादा थोडंसं.' असे काही दीन भिकारी म्हणत होते. दिवस मावळत आला. संध्याकाळ होत आली. तरीही काही भिकारी आशेने तेथेच घुटमळत बसले होते. रस्त्यावरच्या थंड होणार्‍या धुळीत बसले होते. रात्र झाली, शहरात दिवे लागले. गोपाळदासांचा बंगला इंद्रपुरीसारखा दिसू लागला. आकाशातील हजारो तारकाच खाली येऊन त्यांच्या घराच्या आत-बाहेर चमकत होत्या की काय कोणास कळे! का दीनदरिद्री लोकांचे जळते आत्मे होते ते? रात्री गोपाळदासांकडे जलसा होता. प्रसिध्द गवई आले होते. नाचरंगही होता. ऐषआरामाला व सुखविलासाला तोटा नव्हता.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel