शंभुशेट म्हणाले, 'मी एका शाळेला लाख रूपये दिले; परंतु मला माळ नाही. देव अन्यायी आहे!’
भिकाशेट म्हणाले, 'मी माझ्या नावानं विहीर बांधली; परंतु मला माळ नाही. अन्याय आहे!'

सखू म्हणाली, 'काही तरी चूक झाली असावी. माझ्या गळयात कशाला माळ? ज्या धन्याकडे मी काम करते, त्यांच्या घरातील कोणाच्या गळयात ती पडायची असेल. चुकून माझ्या गळयात पडली असावी. मला भिकारडीला कशाला माळ? मी कोणती अशी देणगी दिली?'

इतक्यात तो लहान मुलगा तेथे येऊन उभा राहिला. त्याच्या तोंडाभोवती दिव्य प्रभा होती. जणू सूर्य उगवला. चंद्र उगवला. सारे टकमका पाहू लागले. तो मुलगा म्हणाला, 'सखू, तूच खरी देणगी दिलीस. या गावातील प्रत्येक घराचा दरवाजा मी ठोठावला, म्हटले, 'मला, अनाथाला आधार द्या.' परंतु 'असशील कोणी भामटा. असशील चोरचिलटाचा. असशील कोणत्या हीन जातीचा. नीघ येथून.' अशीच उत्तरं मला मिळाली. फक्त या सखूनं मला म्हटलं, 'ये हो बाळ. तुला न्हाऊमाखू घालते, जेवूखाऊ घालते.' शेटसावकारांनी का देणग्या दिल्या? त्यांनी जिवंतपणी आपली स्मारकं उभारली. आपल्या नावाचे दगड विहीरीतून, शाळांतून बसविले. ती त्यांची स्वत:ची पूजा होती. त्यांनी स्वत:ची प्रतिष्ठा दगडांनी उभारून ठेवली. देव अन्यायी नाही. देव न्यायी आहे. या संसारात सर्वांत थोर देणगी जर कोणती असेल तर ती निरपेक्ष प्रेम, भेदभाव सोडून दिलेलं प्रेम!'

'सबसे ऊँची प्रेम-सगाई।'

असे म्हणून तो मुलगा अदृश्य झाला! सारे खाली मान घालून गेले. सखूचे कौतुक करीत आयाबाया घरी गेल्या. त्या तिन्ही बहिणी सखूला म्हणाल्या, 'सखू, आम्ही शाळेत जातो. पुस्तके वाचतो; परंतु तुझ्यासारखे वागणे, बोलणेचालणे आम्हाला येत नाही. तुला कोण असं वागायला शिकवितं?'

सखू म्हणाली, 'मला कोण शिकवणार? मला शिकविणारी एक माझी आई. ती सांगत असते, 'सखू, आपण गरीब असलो तरी गोड बोलावं. जे दुसर्‍यासाठी करता येईल ते करावं. कोणाला हिडीस-फिडीस करू नये. सारी देवाची लेकरं.' तुम्ही वाईट नका वाटून घेऊ. ही माझी माळ मी तुमच्याच घरी ठेवीन. तुमच्या घरात तिचा सुगंध पसरो.'

तिघी म्हणाल्या, 'आमच्या जीवनात पसरो. सखूसारखं आमचंही जीवन होवो.'

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel