लिलीला एके दिवशी वाटलं मन्यादादाची बासरी आपण मागावी. आपल्या बासरीपेक्षा त्याची बासरी सुरेल आहे, गोड आहे. मागताक्षणी मन्या देईल असे तिला वाटले. प्रेमासाठी प्राण देतात, मग टीचभर बासरी का मन्या देणार नाही? प्रेमाला देण्याला अशक्य असे काय आहे?

त्या दिवशी मन्या खिन्न होता. त्याची वृत्ती प्रसन्ना नव्हती. तो त्रस्त दिसत होता. लिली आली तरी तो हसला नाही. मन्याची बासरी हातात घेऊन ती म्हणाली, 'मन्यादादा, ही मला देतोस? माझी बासरी तू घे व तुझी मी घेते. तू मला वाजव, मी तुला वाजवीन. बासरीच्या रूपानं तू मजजवळ असशील, मी तुझ्याजवळ असेन.' मन्या एकदम संतापला. त्याचे डोळे ते प्रेमळ डोळे लाल झाले. तो एकदम उसळून तिच्या हातातील बासरी खस्कन ओढून म्हणाला, 'अग लबाडये, अग ढोंग्ये, माझी एक मैत्रीण म्हणजे ही बासरी; ती तू पळवणार होय? हे एकच माझं सुख ते तू चोरणार होय? ह्यासाठी इतके दिवस तू पोटात शिरत होतीस. माझ्या बाबांचं हे कारस्थान असेल. ज्या बासरीमुळं मला जीवन कंटाळवाणं होत नाही, ती बासरी लांबवावी असं तुमचं ठरलेलं दिसतं. जा, नीघ येथून. मला दर्शन नको. स्वार्थी व मत्सरी जगाचं मला दर्शन नको.'

फुलावर निखारे पडावेत, हरणाच्या कोवळया अंगावर कठोर व तीक्ष्ण बाण पडावेत, कमळावर थंडगार बर्फाची वृष्टी व्हावी तसे लिलीला झाले. तिला कल्पनाही नव्हती. ती मन्यावर प्रेम करी म्हणून तिने मागितले. प्रेमाला अशक्य काय आहे असे तिला वाटले. मोत्यासारखे अश्रू तिच्या डोळयांतून घळघळले. वेलीप्रमाणे ती थरथरत निघून गेली. लिली मन्याकडे पुन्हा आली नाही.

लिली आता मोठी झाली होती. तिच्या लग्नाच्या वाटाघाटी होत होत्या. ती आता कधी बाहेर जात नसे. तिची आई तिला म्हणे, 'लिल्ये, अलिकडे बासरी का वाजवीत नाहीस? तू गोड वाजवतेस.' लिली म्हणे, 'माझी बासरी बिघडली, माझा पावा पिचला. माझ्या बासरीतून गोड सूर आता हया जन्मी निघणार नाहीत. तिला कोण दुरूस्त करणार? दुरूस्त करणारा एकच आहे, परंतु तो कसा भेटणार, कधी भेटणार?'

लिलीचे लग्न जमले. दूरच्या गावचा तरूण मुलगा तिचा पती म्हणून ठरविण्यात आला. जानवसा लिलीच्या गावात उतरला. लिलीचे लग्न लागले. रात्री लिलीची वरात होती. वधू-वर घोडयाच्या गाडीत बसली होती. वाद्ये वाजत होती. गावाबाहेरच्या देवाच्या देवळात वधू-वर जात होती. गावाबाहेर झाडाखाली मन्या बासरी वाजवीत बसला होता. तो आवाज ऐकून वाद्ये वाजवणारे थांबले. मन्याची बासरीच ऐकू येत होती. गोड बासरी! लिलीच्या डोळयांना पाणी आलं. ती डोळे चोळू लागली. पाठराखणीने विचारले, 'काय ग झालं?' लिली म्हणाली? 'फूल डोळयांत गेलं!'

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel