मृत्युदेवाचें गाणें

ये, सुंदर मृत्यों ये ; समाधान देणा-या मृत्यो ये ; हळुहळू पण गंभीरपणानें ये.  आम्हांस-सर्वांस भेट.  रात्रीं, दिवसां, आज ना उद्यां सर्वांस भेटावयासाठीं ये.  हे कोमल मृत्युदेवा ये, ये, ये.

सर्व लोक या विश्वाची स्तुति करतात.  हे विश्व अनंत आहे.  अफाट आहे.  शेकडों आश्चयर्कारक गोष्टी येथें आहेत ; नाना प्रकारचें ज्ञान आहे.  या विश्वांत प्रेम आहे, स्नेह आहे.  तरीपण या सर्वांपेक्षा तुझीच खरी स्तुति करावी अशा योग्यतेचा तूं आहेस.  तूंच स्तवनीय आहेस, नमनीय आहेस ; तूं रमणीय आहेस ; कमनीय आहेस.  मृत्युदेवा! तुझे हात सर्वांना कवटाळतात, सर्वांना आलिंगन देतात, तुझ्याजवळ भेदभाव नाहीं.

हे मृत्यो, हे कृष्णवर्ण आई - होय,  तूं माझी काळी सांवळी आईच आहेस; जगाची आई आहेस.  आई खेळणा-या मुलास सायंकाळ झाली म्हणजे हळूच पाठीकडून येऊन उचलून घेते व निजविते व माझें बाळ दमले म्हणते.  त्याप्रमाणें हे मृत्युआई!  जगाच्या मैदानावर खेळणारे जे आम्हीं, त्या आमच्या पाठीमागून तूं हळूंच पाय न वाजवतां येतेस व आम्हांला घेऊन जातेस व निजवतेस.  हे मृत्युआई, आजपर्यंत जगांत मनापासून तुझें स्तोत्र कोणीच केलें नाहीं का?  तुझें स्वागत - मनापासून कोणीच केलें नाहीं का?  तर मग मी करतों, हो तुझें गाणें, मी रचतों तुझें स्तोत्र.  सर्वांपेक्षा तूं थोर आहेस.  मी तुझी गाणीं गातों, ये.  न चुकतां नि:शंकपणें ये.  मला तुझी भीति नाहीं वाटत.  तू तर आई - ये.

हे मृत्युमाई, तूं मक्त करणारी आहेस.  ने, आम्हांस ने.  ये, मृत्युदेवा ये.  तुझ्या अपरंपार उसळणा-या लाटांवर हे जीव सुखानें घेऊन जा.  ये, तुझीं मी आनंदाने गाणीं गातों, गुणगुणतों.  हे मृत्यु आई!

*            *            *

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel