हे दृश्य दाखवून एल्फिन्स्टन म्हणाला, ' बाबासाहेब, तुमची राज्यें नष्ट होण्यास आणि आमचीं स्थापित होण्यास मुख्य कारण काय हें तुमच्या लक्षांत आलेंच असेल.  अंमलदाराचा हुकूम आमचे शिपाई प्राण गेला तरी पाळतात, परन्तु तुमचे लोक पळतात.'

वरील गोष्ट खोटी आहे काय?  आम्ही युरोपियन लोकांप्रमाणे शिकलेलें सैन्य ठेवूं लागलों, तर ती शिस्त आपल्या सैन्यांत मुरली नव्हती.  मैदानी लढायांची आमच्या लोकांस तितकी संवय नसे.  शिपायांनी जागा न सोडणें हा मैदानी लढयांतील महत्त्वाचा भाग असतो.  समोरासमोरच्या लढाईत सैन्य बेशिस्त झालें कीं, पराजय झालाच.   अहमदशहा अब्दालीनें त्यांचे सैन्य जेव्हा पळूं लागलें, तेव्हां त्या पळणारांची मुंडकीं मारण्याचा हुकूम केला.  कारण एक पळूं लागला कीं सारे पळूं लागतात.  पहिल्या बाजीरावानें वसईच्या हल्ल्याच्या वेळीं एका पत्रांत लिहिले आहें, 'जे मागें फिरतील त्यांची डोकीं परिच्छिन्नपणें मारावी .'  सैन्य माघारी न वळणें हें लढाईतील विजयाचें मोठें साधन आहे.

नेपोलियन आपल्या जयाची किल्ली सांगतांना म्हणतो, ' शत्रुपक्षाची चलबिचल झाली आहे, असें मला दिसतांच मी त्यांच्यावर शिलकी सैन्यानें जोराचा हल्ला करीत असें. '  अशी चलबिचल उत्पन्न होऊं न देणें हें मुख्य काम आहे.  सैन्य पळूं लागल्यानें ही चलबिचल उत्पन्न होते.

वाटर्लू येथे १८१५ मध्यें इंग्लिश सैन्याचा तळ पडला होता.  जर्मन सैन्याची वेळेवर मदत होण्याचें चिन्ह दिसेना.  फ्रेंच तर चवताळून आले होते.  फ्रेंचांच्या जोरदार हल्ल्यांसमोर आपला टिकाव कसा लागेल याची वेलिंग्टन या इंग्रजी सेनापतीस धास्ती होती.

वेलिंग्टन घोडयावर बसून आपल्या शिपायांच्या रांगांतून हिंडला व म्हणाला, 'माझ्या शिपायांनो, धीर सोडूं नका, जाग्यावरून हलूं नका.  आपणांस इंग्लंडातील लोक काय म्हणतील याचा विचार करा.'  ते शिपायी वेलिंग्टन यास म्हणाले, 'महाराज, आपण तिळमात्र काळजी करूं नका ; आमचें कर्तव्य आम्ही जाणतों, तें आम्ही नीट पार पाडूं. '  तें कर्तव्य म्हणजे कोणतें, तर सेनापतीनें सांगितल्याप्रमाणें वागणें.  नेपोलियननें जर्मन मदत इंग्रजांस येऊन मिळण्यापूर्वी निकराचे हल्ले केले.  परन्तु इंग्रज सैन्य मागें गेलें नाहीं ; इंग्रजांची फळी फोडतां आली नाहीं.  शेवटी सायंकाळी चारचे सुमारास जर्मन मदत आली व इंग्रज विजयी झाले.

आपलें सैन्य गैरशिस्त, सेनापति कमी दर्जाचे, शस्त्रास्त्रें हिणकस, आणि फंदफितुरी व ऐक्याचा अभाव, इत्यादि कारणसमूहांचा परिणाम म्हणजे आपली राज्यें जाणें व इंग्लिशांचे राज्य होणें  होय!  आपणांस शिस्त, आज्ञाधारकपणा व ऐक्य या सद्गुणांचे नीट संवर्धन केल्याशिवाय स्वराज्य कसें मिळेल, मिळालें तरी कसें राखता येईल?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel