१३ जपानमधील कांहीं विशिष्ट गोष्टी

जपानी लोक आपल्या देशास उगवत्या सूर्याचा देश म्हणतात.  त्यांचे राष्ट्रीय निशाण याच अर्थाचें द्योतक आहे.  पांढ-या स्वच्छ पार्श्वभूमीवर उगवत्या सूर्याचें रक्तबिंब ही त्यांच्या निशाणाची खूण आहे.

जपानांत भूकंप वगैरे फार.  यामुळें जपानांतील विद्वान भूगर्भ-शास्त्राचा जास्त अभ्यास करतात.  भूगर्भ-शास्त्रवेत्त्यांमध्यें तेथील शास्त्रज्ञांची नांवे प्रामुख्याने असतात.

जपानांतील फूजीयामा या पर्वतास तेथील लोक फार पवित्र मानितात.  हा पर्वत फार सुंदर आहे.  त्याची उंची १२३६५ फूट आहे.  हा एक  ज्वालामुखीच आहे.  या पवर्ताचीं शिखरें नेहमीं बर्फाच्छादित असतात.  या पर्वतांच्या यात्रेस पुष्कळ माणसें जातात.  जपानी चित्रावर पुष्कळ वेळां फूजीयामा पर्वताचें चित्र असते.  तिकडील बालबालिका या पर्वताच्या स्तुतिपर एक गोड गीत पुष्कळ वेळां म्हणतात. त्या गीताचा भावार्थ सांगतों :

"परमेश्वरांने हें सुंदर निष्पोत बेट निर्माण केलें.  तें बेट उत्पन्न केल्यावर त्याला भूषविण्याची ईश्वरास इच्छा झाली व त्या इच्छेचें दृश्य स्वरूप म्हणजेच 'फुजिसान' पर्वत होय राजवाडयांत राहणा-या राजाच्याहि मनास, त्याचप्रमाणें चंद्रमौळी झोंपडीत राहणा-या दरिद्री नारायणाच्याहि मनास फूजियामा सारखाच आनंद देतो.'

जपानी लोकांचा मच्छिमारी हा एक महत्त्वाचा उपजीविकेचा धंदा आहे.  मासे हें जपानी लोकांचे आवडतें खाद्य आहे.   मच्छिमारीची एक विचित्र पध्दत आज सुमारें हजार वर्षांपासून जपानांत चालू आहे.  मासे पकडण्यासाठीं जपानी लोक कार्मोरंट नांवाचा एक पक्षी पाळतात.  या पक्षाच्या गळयाभोंवतीं एक लोखंडाची कडी किंवा दोरी असते; म्हणजे त्या पक्षानें पकडलेला मासा त्याला गिळता येऊ नये.  या पक्ष्यांचा नदींतील मासे पकडण्याच्या कामीं फार उपयोग होते.  मासे पकडण्यास जातांना या पक्षांना पेटींत (जाळीदार) घालून नदीवर नेतात; तेथें त्यास सोडतात.  थोडया वेळांत हा पक्षी पुष्कळ मासे पकडून आणतो.  हा त्या कामांत मोठा पटाईत.  पुरेसे मासे झाले म्हणजे पुन्हां त्या पक्षाला पिंज-यांत घालतात.  हा धंदा करणा-यांजवळ असले चार पांच तरी पक्षी असावयाचेच.

जपानी लोकांत हरकसबीपणा फार.  जपानांत तांदुळ होतो.  अर्थात् भाताचा पेंढा पुष्कळ असतो.  या पेंढयाच्या नाना वस्तू ते करतात.  वहाणा, रेनकोट, टोप्या, चटया, दोर, टोपल्या इत्यादि वस्तू पेंढयापासून ते करतात.  हे पेंढयाचे रेनकोट ते पावसाळयांत वापरतात.  पेंढयापासून केलेल्या वाहाणा फारच स्वस्त असतात.  अर्धा पाऊण आणा दिला कीं नवीन वाहणांचा जोड!  यामुळें किती जोड फाटले तरी ते पर्वा करीत नाहींत.  पावसाळयांत मात्र या वाहाणा उपयोगी नाहींत.  पावसाळयांत लाकडी वाहणा वापरतात.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel