वर्गांत तुम्हीं इतिहास शिकत असाल, त्याचबरोबर जीवनाचें पुस्तक वाचायला, त्यांतले जगाचे व समाजाचे प्रश्न हाताळायला तुम्ही शिकलें पाहिजे व तुमच्या शिक्षकांनी तुम्हांला शिकविलें पाहिजे!  माझ्या एका शिक्षक मित्रानें आपल्या पेशासंबंधी कुरकुर केली तेव्हां मी त्याला विचारलें कीं, तूं आपल्या विद्यार्थ्यांजवळ कधीं चौकशी केली आहे का कीं, प्रत्येकाला कपडे किती आहेत, त्याच्या पालकाचें उत्पन्न किती आहे म्हणून?  त्यानंतर त्यानें मला तशी चौकशी करून सांगितलें कीं, एका मुलापाशी २ डझन कपडे आहेत तर एकापाशीं अवघा एक शर्ट आहे.  एकाच्या मालकीचे ३ बंगली आहेत तर एक ३ रु. च्या भाडयाच्या खोलींत आहे.  या विषमतेचा विचार तुमच्या डोक्यांत कधीं येतो का? बीजगणिताचे प्रश्न तुम्हीं वर्गांत नेहमीं सोडवतां पण असल्या विषमतेचें, दारिद्रयाच्या प्रश्नांचा विचार कधीं करता का? हा प्रश्न कोण सोडवील? अशी ही सामाजिक विषमता का असावी याचा विचार करा?  वर्गावर्गांतले हे प्रश्न समजूं लागले तर समाजासंबंधींचे गहन प्रश्न सहज समजूं लागतील.

कोणी म्हणतील हें सारें लहानपणीं कां? हें सारें भयाण आहे.  मुलांच्या कोंवळया बुध्दीवर त्याचा ताण पडेल.  पण माझ्या एका भाच्याची गोष्ट सांगतों ती ऐका.  त्याला समुद्राची फार भीति वाटायची.  मी त्याला अलिबागला आल्यावर मुद्दाम समुद्रावर घेऊन गेलों. त्याला समुद्राचें सौम्य स्वरूप समजावून सांगितलें.  लाटांमुळें व वाहत्या वाळूंमुळें पाण्याला कशा गुदगुल्या होतात हें समुद्रांत पाय टाकल्याखेरीज समजणार नाहीं हें पटविलें.  समुद्रात नांव ढकलायची असेल तर आधीं ढोपरभर पाण्यांत शिरलं पाहिजे.  कधीं गळाभर पाण्यांत डुंबलं पाहिजे. जीवन-सागराचें असेंच आहे!  विद्यार्थ्यांना पुढें समुद्रांत यावयाचं आहे ना, मग त्यांना समुद्रापासून दूर ठेवूं नका.  विद्यार्थ्यांनों, शाळेच्या परिक्षेत ३३ टक्के गुण मिळविण्यापुरताच अभ्यास करा आणि बाकी वेळ इतर कामांत घालवा.

शाळेच्या चालकांच्या हरकती येतील पण त्याकरितां का आपण अडून बसायचं?  विद्यार्थ्यांना नित्य राजकारण नसेल पण नैमित्तिक राजकारण अवश्य आहे!  काँग्रेस प्रचार, किसान संघटना, कामगार संघटना, हीं कामें विद्यार्थ्यांनी अवश्य हातीं घेतलीं पाहिजेत.  विद्यार्थी जग व बाहेरील जग यांची फारकत करूं नका.  समाजाचे प्रश्न हे सामाजिक स्वास्थ्याप्रमाणें आहेत.  समजा, एखाद्या शहरांत कॉलरा झाला तर हेडमास्तर 'बस इथं भूमिति सोडवीत' असं नाहीं ना सांगणार?  आग लागली तर स्वस्थ बसून शिस्त पाळायला नाहीं ना लावणार?  मग सामाजिक,राष्ट्रीय प्रश्न जर असे नैमित्तिक स्वरूपांत आले तर त्यांचे स्वागत विद्यार्थांनी अट्टाहासानें केलें पाहिजे.  आमच्या खानदेशांत कामगारांची सभा झाली, किसानांचा मोर्चा निघाला कीं, विद्यार्थी पुस्तकें टाकून आपल्या देशबांधवांकडे येतो.

अनेक मोठमोठाले प्रश्न समाजापुढें उभे ठाकले आहेत ; त्यांना घाबरूं नका.  तोंड द्या!  जगाचे प्रश्न धाडसानें हाताळले पाहिजेत.  शाळेंत तुमची शारीरिक तपासणी करतांना लाँग साईट किंवा शॉर्ट साईट कशी काय आहे तें सांगतात.  पण इनसाईट कशी काय आहे ह्याची परीक्षा होते का कधीं? ... आज राष्ट्राला एकच रोग झाला आहे .  हार्ट डिसीज ...  तुमच्या परीक्षा शाळा कॉलेजांतच नाहीं होत, बाहेरहि होत आहेत.  भावना व विचार, डोकं व अंत:करण ही दोन्ही आवश्यक असतात.  झाडाची मुळें उत्तरच दिशेला पसरलेलीं का कोणी पाहिलीं आहेत!  घराच्या खिडक्या अमुक एका दिशेलाच असाव्या असें कां कोणी म्हणतो?  तसेंच विद्यार्थ्यांचे ज्ञान सर्व बाजूंनी परिपूर्ण, निदान प्रयत्नपूर्ण असावें याला काय हरकत असावी ?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel