आपल्याकडील स्त्रिया मुलें कडेवर घेऊन जातात; जपानी स्त्रिया पाठुंगळीस घेतात.  जपानांतील मुलींचे मुख्य काम म्हणजे आपल्या धाकट्या भावंडास सांभाळणें.  कोणालाहि मुलगा झाला म्हणजे जो आपल्या घरावर एका काठीला कागदी मासे बांधून ठेवतो.  मूल १०० दिवसांचे झालें म्हणजें मोठा उत्सव करतात.  घरांतील लहान मुलांस खाऊ, खेळणी देतात;  नंतर घरांतील सर्वांत वडील मुलीच्या स्वाधीन तें मूल करण्यांत येतें.  १०० दिवसांच्या आधीं मूल घराबाहेर नेण्यास मोकळींक नसते.  आपल्या कडील सूर्यदर्शन तिसरें महिन्यांत करण्यासारखेंच हें आहे.

खास मुलांचे असे दोन उत्सव जपानांत असतात.  एक मुलांचा व एक मुलींचा.  मुलांचा उत्सव मे महिन्याच्या पाचव्या तारखेस येतो.  या सणास निशाणाचा दिवस म्हणतात.  नाना रंगाचीं; नाना आकारांची लहान मोठीं निशाणें सर्वत्र फडकत असतात.  हीं निशाणें करण्यांत मोठी कल्पकता दाखवतात.  हीं निशाणें माशांच्या वगैरे प्राण्यांचे आकाराचीं असतात.  कांही कागदी मासे तर वीस-पंचवीस फूट मोठे असतात.  त्यांची तोंडें उघडीच ठेवतात!  यामुळें वारा सुटतांच तोंडातून हवा आंत जाते व फुगून हे कागदी मासे खरोखरच्या माशांप्रमाणे दिसूं लागतात.  निरनिराळया प्राण्यांचे आकार अगदीं हुबेहुब करतात.  या दिवशींचा मुख्य खेळ पतंग उडवणें.  पतंगांचे आकारहि चित्रविचित्र असतात.  ब-याच पतंगाचे आकार कार्प नांवाच्या माशाच्या आकाराचे असतात.  जपानी लोक कार्प माशाला पराक्रमाची देवता समजतात.  आपल्या मुलानें पराक्रमी व्हावें अशी प्रत्येक जपानी पित्याची इच्छा असते.  म्हणून या दिवशीं मुलांना कार्पच्या आकाराचे पतंग मुद्दाम देण्यांत येतात.

मुलींच्या उत्सवाचा दिवस मार्चच्या तिस-या तारखेस येतो.  या दिवसाला ' बाहुल्यांची मेजवानी ' असें म्हणतात.  या दिवशीं मुलीला सुंदर बाहुली देणें म्हणजे मोठा मान समजतात.  या बाहुल्या फार जुन्या असतात.  या घरकुलांतून मनुष्यास लागणा-या सर्व सोयी लहान प्रमाणांत करून ठेवतात.

जपानांत मुलांना बरेच लौकर शाळेत घालतात.  तीन चार वर्षाच्या मुलांमुलींस शाळेंत घालतात.  मुलें लहान असल्यामुळें वाटेंत चुकतील वगैरे म्हणून पालकाचें नांव, पत्ता वगैरे ज्यावर कोरलेलें आहे असा पितळेचा बिल्ला त्यांच्या दंडावर बांधलेला असतो.  पोलीस तो बिल्ला पाहतो व मूल चुकलेलें असेल तर त्या पत्त्यावर पोंचवतो.  शाळेत जाणा-या सर्व मुलांचे त्या त्या वर्गाचे पोषाख ठरलेले असतात.  एकाच वर्गात दोन निरनिराळया रंगाचे पोषाख केलेले मुलगे आढळणार नाहींत.  तांबडा रंग तिसरी यत्तेचा, काळा चवथीचा असें ठरवून ठेवतात!  जपानी लेखन-पध्दति आपल्या अगदीं उलट.  जेथें आपलें पुस्तक संपतें तेथें त्यांचे पहिलें पान येतें.  आपण आडव्या ओळी लिहितों, ते उभ्या लिहितात.

जपानांत रेल्वे आहेत.  परंतु बराच प्रवास जिनरिक्षा गाडीनें करतात.  जिन म्हणजे माणूस ;रि. म्हणजे शक्ति ; शा म्हणजे चाक.  माणसाच्या शक्तींने चालणारें चाक असा हा समास सोडवावयाचा.  ही दुचाकी गाडी माणूसच ओढून नेतो.  दरताशीं भाडें पांच सहा आणे पडतें.  बहुतेक गाडयांतून एकच माणूस बसण्याची सोय असते.  परंतु कांहींतून चोहोंचीहि सोय असते.  गाडीला वर टप असतो व टपाला सुंदर रंग दिलेला असून वेलबुट्टी काढलेली असते.  साध्या पण रमणीय अशा चित्रकलेंत जपानी लोक फार प्रवीण असतात.  ही गाडी ओढणाराला किकि म्हणतात.  तो दुडक्या चालीनें चालतो.  रस्ता चांगला असेल तर तो दिवसाला २० मैल गाडी घेऊन जातो.  सावर्जनिक रिकशांना परवाना काढावा लागतो.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel