भीष्म हे नि:स्पृह होते.  परशुरामासारख्या गुरूंनी विवाह करण्यांस सांगितलें परंतु त्यांनीं गुरूंचे हें अयोग्य सांगणें मानलें नाहीं.  गुरू जरी झाला तरी तो जर अयोग्य सांगत असेल तर त्याचा खुशाल परित्याग करावा.  भीष्मांनी कर्तव्य व धर्मपालन म्हणून परशुरामांजवळ लढाईसुध्दां केली.  गुरुभक्तीपेक्षां सत्यभक्ति थोर आहे.

मुलांनो, प्राचीन काळांतील भीष्माचार्याप्रमाणें सतराव्या शतकांस समर्थ रामदास स्वामी होऊन गेले.  देवव्रतास जसें भीष्म नांव मिळालें तसें रामदास स्वामींस त्यांच्या कर्तबगारीमुळे ' समर्थ ' हे नामाभिधान प्राप्त झालें.

लहानपणींच एका कोप-यांत बसून समर्थ विश्वाची चिंता करूं लागले.  आई मुलास हुडकीत आहे, परंतु मुलगा सांपडेना.  शेवटीं समर्थ एका एकांतांत आढळले.  'आई, चिंता करितों विश्वाची ' हें त्यांचे बाळपणींचें उत्तर, मुलांनो, लक्षांत ठेवा.  त्या वेळेस महाराष्ट्र, सर्व भारत दीन झाला होता.  मुसलमान शिरजोर झाले होते.  धर्म नाहिसा झाला, खावयास मिळेनासें झालें.  राष्ट्राच्या तरणोपायाची चिंता समर्थांस लागली.  आधीं स्वत:चा तरणोपाय प्राप्त करून घेण्यासाठी त्यांनी बारा वर्षे  घोर तपश्चर्या केली.  ब्रह्मचारी व्रतानें राहून स्वत:चें मन ताब्यांत घेतलें, ईश्वरी अनुग्रह प्राप्त करून घेतला, नंतर देशस्थिति पहाण्यासाठी सर्वं हिंदुस्थानभर प्रवास केला आणि महाराष्ट्र ही आपली कार्यभूमि ठरविली.  धर्माचा, तेजस्वी विचारांचा प्रसार करण्यासाठीं हजारों मठ स्थापन केले.  जेथें मुसलमानांची जास्त वस्ती तेथें समर्थांचे दोन मठ असावयाचे!  या मठांची नीट व्यवस्था लाविली.  आचारनियम लावून दिले.  या मठांतून ग्रंथ-संग्रहालयें स्थापन केलीं.  कांहीं कांहीं मठांतून हस्तलिखित हजार हजार ग्रंथ होते! त्या काळांत ही केवढी कामगिरी!

राष्ट्रांत प्रथम विचारप्रसार व्हावा लागतो, मग राष्ट्र कृति करतें.  Thought  is  more  Powerful  than  sword.    तरवारीपेक्षां विचार महत्त्वाचा आहे.  फ्रेंच राज्यक्रांतीस रूसोचा सोशल काँन्ट्रॅक्ट हा ग्रंथ कारणीभूत झाला.  नेपोलियन म्हणतो,  ' If  there  would  not  have been  Social  Contract,  French  Revolution would  not  have  happened. '   यावरून विचारप्रसारांस किती महत्त्व आहे, हें मुलांनो, ध्यानांत धरा.  समर्थांनी याच विचारांचा प्रसार केला.  ' मराठा तेवढा मेळवावा, ' ' शक्तीनें मिळती राज्यें, युक्तीनें कार्य होतसे.  शक्ति-युक्ति जये ठायीं , तेथें श्रीमंत धांवती '  वगैरे ठणठणीत विचार जनतेपुढें मांडले.  'उत्कट भव्य तें घ्यावे, मिळमिळीत अवघेंच टाकावें ' ' कांहीं एक उत्कटेंवीण, कीर्ति कदापि नाहीं जाण ', ' जितका व्याप तितकें वैभव, न्यायासारखा हावभाव ' 'यत्न तो देव जाणावा ' -- अशा प्रकारचे धीरोदात्त विचार, कर्तव्यचालना देणारे विचार सर्वत्र पसरिले.  श्रीछत्रपतींचा पराक्रम व हे विचार यांनी देशांत स्वराज्य निमार्ण केलें, महाराष्ट्र खडबडून जागा झाला.  समर्थ म्हणतात, ' धीर धरा धीर धरा,' समर्थ म्हणतात, 'हडबडूं गडबडूं नका.' समर्थ म्हणजे मूतिर्मंत आशावाद होते.  महाराष्ट्रांत जोर व आशा त्यांनी निर्माण केली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel