हिंदुस्तान स्वत:च्या लेकरास धान्य देण्यास समर्थ आहे.  लागणारा कपडा मात्र आज हिंदुस्थान सर्व निर्माण करूं शकत नाहीं.  हे कापड आज इंग्लंडमधून येत आहे.  परंतु ही जरूरी आपण मनांत आणलें तर सहज भागवूं शकूं.  हिंदुस्थानांतील गिरण्या व हातमाग यांनी सहकार्य केलें तर हें काम होण्यासारखें आहे ; परंतु सहकार्याशिवाय हे शक्य नाहीं.  आपल्या देशांतील हातमाग सुरू झाले पाहिजेत ; व या कारागिरांना उत्तेजन देणें हें श्रीमंतांचे व सुशिक्षितांचे आद्य कर्तव्य आहे.  इंग्लंड, अमेरिका वगैरे देशांतहि खेडयांतून सूत विणण्याचे व कापड करण्याचे हातमाग अजून आहेत.  हे कापड महाग पडतें.  परंतु इंग्लंडमधील गिरणीवालें, कारखानदार हें हातमागावरचे महाग कापड विकत घेऊन खेडयातील बायाबापड्यांचा हा मारूं देत नाहींत.  याची आमच्या सुशिक्षितांस व श्रीमंतांस लाज वाटली पाहिजे.  जो जो कांही हस्तकौशल्यानें जगण्याचा प्रयत्न करतो त्या त्या माणसास आपण आधीं सहाय्य करण्यास, त्याचा माल विकत घेण्यास तयार राहिलें पाहिजे.  आपल्या शेजा-याचें कल्याण आधी चिंतिलें पाहिजे.  आपल्या जवळील कारागिरांना, मजुरांना व उत्पादकांना सहाय्य करणें म्हणजें पर्यायेंकरून देशाचीच सेवा करणें होय.  या प्रकारें देशाची आर्थिक  परिस्थिति आपण हरप्रयत्नानें सुधारू शकूं आणि परावलंबनाला परागंदा करूं.  परंतु खरी तळमळ व इच्छा असेल तर ना!

दुसरी गोष्ट तरुणांनी लक्षांत ठेवावी.  आपण गरीब असूं, आपण शरीरानें दुर्बळ असूं ; तरी आपण आपलें राष्ट्रशील उत्कृष्ठ राहील अशी खबरदारी घेतली पाहिजे.  आपलें चारित्र्य निष्कलंक ठेवणें हे आपणा सर्वांस शक्य आहे.  स्वाभिमानी व उदार होण्यास आपणांस कोण अडवूं शकेल?  जर आपण स्वत:स किंमत दिली तर जगहि आपणांस किंमत देई ल, तुम्ही स्वाभिमानी व्हा.  म्हणजे जगहिं तुम्हांस मान देईल.  आपली इभ्रत, आपला स्वाभिमान राखण्यांस शिकणें हीच स्वराज्याची पहिली पायरी आहे.  खरा विजय, खरा मोठेपणा हा चारित्र्यावर आहे.  तेंच राष्ट्र खरोखर मोठे आहे, ज्या देशांत नेकीचे, उदार, मानधन लोक पुष्कळ आहेत. हिंदुस्थानावर तुमचें खरे प्रेम असेल तर हिंदुस्थानास शोभेल असे वर्तन ठेवा.  आपल्या वर्तनानें हिंदुस्थानची सर्वत्र नाचक्की होऊं देऊं नका.  तुमचे शील उदात्त असेल तर देशविघातक कोणतीहि गोष्ट करण्यास मोहानें तुम्ही तयार होणार नाही.  कपटपटु लोक तुमच्या समोर पैशाच्या राशी ओततील, सन्मानदर्शक  पदव्या देतील, पण तुम्ही खरें नाणें असाल, चारित्र्यवान असाल तर ते पैसे व पदव्या यांवर लाथ माराल.  तुम्ही कसे वागतां व कसे आहांत, तुम्ही काय करतां, यावरच खरी देशभक्ति अवलंबून आहे, तुमच्या अधिकारावर व श्रीमंतीवर नाहीं तर आपलें चारित्र्य निर्दोष असेल तरच आपल्या आयुष्याचा नीट हिशेब आपणांस देतां येईल, कांही केलें असें दाखवता येईल.  उत्कृष्ट शील संपादन करा म्हणजेच देशाची तुम्ही खरी सेवा केली असें होईल, मगच तुम्ही भारताचे सत्पुत्र शोभाल व सत्पुत्राची जननी भरतभूमि जगांत मिरवाल राहील.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel