आघाडीवर काम करणा-या स्त्रीयांचे पहिले पथक कुमारी टिंग्लिंग् या उत्कृष्ट लेखिकेंने काढलें.  १९३८ च्या मे महिन्यांत या पथकाचे फक्त आठ हजार स्त्री-सभासद होते.  हे सभासद वाढतच गेले.  पांच हजार भगिनी शिपायांचे कपडे धुण्याचें काम करीत, सहा हजार कपडे शिवण्यांचे काम करीत.  साडे आठहजार स्त्रियां नर्सिस होऊन शुश्रुषेचें काम करीत.  २५०० भगिनी अठरा वर्षांखालील मुलींना नवीन राष्ट्रसेवेचें शिक्षण देण्यांत गुंतल्या.  ३६ हजार भगिनी पडित जमिनी लागवडीस आणण्यांचे काम करूं लागल्या.  प्रत्येक खेडयांतील अशिक्षितांचे वर्ग घेणें, त्यांना वाचून दाखवणें, वगैरे कामी शेकडों स्त्रिया लागल्या.  कम्युनिस्ट भगिनी तर पुरुषांबरोबर प्रत्यक्ष रणांगणांत आगीच्या वर्षावांत ऊभ्या रहात.

अफाट पसरलेल्या चीन देशांत अद्याप हा आरंभच आहे.  परंतु स्त्रियांचा आत्मा झपाटयानें जागा होत आहे.  स्त्रिया प्रत्यक्ष रणभूमीवर लढत आहेत, एवढेंच नव्हे तर गनिमी पध्दतीचे हल्ले करून जपानी शिपायांना सळो की पळो करून सोडण्याचे कामींहि त्या पुढाकार घेत आहेत.  चिनी स्त्रिया मागें आहेत असें आतां कोण म्हणेल?  स्पेनमधील शूर स्त्रियांप्रमाणे चीनमधील स्त्रियाहि स्वातंत्र्याचे व संस्कृतीचे रक्षणासाठीं जीवनें देत आहेत, अहोरात्र झटत आहेत, शिस्तीनें अखंड काम करीत आहेत.

जसजसा जपानचा राक्षसीपणा वाढत आहे, क्रूरपणा वाढत आहे, तसतसा स्त्रियांचा राष्ट्रीय निश्चय अधिकच गंभीर होत आहे.  एका युनान प्रांतांतून ७ हजार स्त्रिया रणांगणांत मरण्यासाठीं निघाल्या.  त्या ७ हजारांतून निवडक स्त्रिया घेतल्या गेल्या.  आईबापांचा विरोध त्यांनी जुमानला नाही.  शेंकडों मैल त्या पायीं चालत गेल्या.  त्यांचे एकच ब्रीदवाक्य होतें, '' भगिनींनो, लढाईच्या वेळी कुटुंबाचा विचार करावयाचा नसतो.  पलटणींत नांवे नोंदवा आणि देशासाठी मरा.''

स्त्रिया ठिकठिकाणी सेनापति होत आहेत. पलटणींना हुकूम देत आहेत ; अभिनव असा हा देखावा आहे.  मुलांना जन्म देणा-या माता आज नवचीनला जन्म देत आहेत.  आणि या नवचीनचा भव्य दिव्य प्रभावी जन्म व्हावा म्हणून आज आगींतून जाण्याच्या वेदना सहन करीत आहेत.

या चिनी स्त्रियांच्या त्यागमय जीवनापासून भारतीय स्त्रियांना शिकण्या-सारखें कांहीच नाहीं का? भारतासहि स्वातंत्र्य मिळवावयाचें आहे.  स्वातंत्र्याचा लढा चालला आहे.  या लढायांतील आपलें स्थान भारतीय स्त्रिया कधीं घेतील.

-- वर्ष २, अंक ७

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel