आणि एका सणाच्या दिवशी मावश्यांकडे दोन पाहुणे आले. एक मुलगा नि एकमुलगी तीही दोघे तरूण होती. एके दिवशी चहा पिऊन प्रताप, ती दोन्ही मुले, आणि रूपाही बागेत खेळायला गेली. प्रताप नि रूपा एका बाजूला आणि पाहुणी तरूण मंडळी दुसर्‍या बाजूला. प्रतापला रूपाचे मुखमंडळ आवडे. परंतु अधिक विचार त्याच्या मनात आला नव्हता. ती तरूण पाहुणे मंडळी प्रताप नि रूपा यांना पकडण्यासाठी धावली. खेळ असा होता की, ज्यांच्यावर राज्य त्यांनी विरूध्द बाजूच्या दोघांना एकमेकांच्या हातांत हात घालू द्यायचा नाही. एक, दोन, तीन- झाला खेळ सुरू. प्रताप रूपाच्या हातांत हात देण्यासाठी तिच्या पाठीमागे धावत होता. त्याला तसे करू न देण्यासाठी दुसरी दोघे धावपळ करीत होती. आणि वाटेत एक काटेरी झुडूप आले. पलीकडे रूपा होती. प्रताप थबकला.

‘अरे तिकडून वळून ये. आपण भेटू. ये पटकन्.’ ती ओरडली. तो बाजूने वेगाने येऊ लागला. परंतु तेथे एक खळगा होता. त्या खळग्यांत गवत वाढलेले होते. खळगा आहे असे त्याला वाटले नाही. आणि गवतावर दव पडले होते. प्रतापचा पाय घसरला. तो पडला. परंतु लगेच उठला, हसला, जणू काही झालेच नाही. रूपा हरणाप्रमाणे त्याच्याकडे धावत आली. तिचे तोंड आनंदाने फुललेले होते. तिचे ते काळेभोर डोळे मधुर तेजाने चमकत होते. तिचा मुखचंद्र घामाने डवरला होता. किती सुंदर दिसत होती ती! तिने त्याचा हात हातात घेतला. तिने तो कुरवाळला; त्या हाताचे तिने चुंबन घेतले.

‘काटे बोचले. होय ना? नक्कीच बोचले. कोठे बोचले?’ आपल्या केसांची सारखी पुढे येणारी बट मागे सारीत तिने प्रेमस्नेहाने विचारले.
‘मला काय माहीत की तेथे खळगा आहे.’ तो म्हणाला आणि ती दोघे एकमेकांच्या जवळ बसली, हसली, आनंदली. त्यानेही तिच्या हाताचे चुंबन घेतले.

‘चल, आपण जाऊ’ असे म्हणून त्याच्या हातातून हात मोकळा करून ती पळून गेली. झाडाची एक डाहाळी तोडून घेऊन ती वारा घेत दूर उभी राहिली. तिने त्याच्याकडे प्रेमाने पाहिले आणि पटकन् त्या दुसर्‍या खेळाडूंना ती जाऊन मिळाली. त्या दिवसापासून त्या दोघांत, दोन तरूण जीवांत असणारा पवित्र, प्रेमळ, कोमल संबंध निर्माण झाला. ती किंवा तिचा पदर दुरून दिसताच त्याची सारी सृष्टी उजळे, त्याचे सारे विश्व सुंदर होई. सूर्य येताच ज्याप्रमाणे सारे प्रकाशमय सुंदर दिसते तसे त्याचे होई. त्याला सारे जीवन आनंदमय, प्रकाशमय वाटे. आणि तिलाही तसेच वाटे. त्याच्या अस्तित्वाचा, जवळपास असण्याचा विचारही तिच्या मनाला फुलवी, प्रमुदित करी. दोघे एका निराळयाच, भावनामय, कोमल अशा जगात विहरू लागली. प्रतापला कधी तारूण्यसहज खिन्नता व उदासीनता आलीच तर रूपाचा विचार ते सारे दूर करी. पुन्हा त्याचा चेहरा फुले; हृदय उत्साहाने भरे.

रूपाला घरात काम असे. तरीही ती वेळ काढी. प्रताप तिला पुस्तके वाचायला देई. गोष्टींची पुस्तके देई. कादंबर्‍या देई. कधी अंगणात वा बागेत ती भेटत, बोलत. त्यामुळे जेव्हा एकत्र येत तेव्हा त्यांचे डोळे आता निराळेच बोलत. त्यामुळे तोंडाने बोलणे फार होत नसे. एकमेकांकडे उत्कटतेने बघावे, हाताने हात दाबावा असे होई; ओठ मुकेच असत; एखादे वेळेस त्यांचे हे प्रेम पाहून त्याच्या मावश्या घाबरत, परंतु त्यांचे प्रेम निर्मळ, निष्पाप होते; म्हणून सांभाळ होता. रूपाच्या शरीरावर सत्ता मिळावी असा विचार कधी मनात आलाच तर, प्रताप कावराबावरा होई; तो घाबरे. त्याच्या मावश्यांना वाटले की, आपला भाचा ध्येयवादी असल्यामुळे जर त्याचे प्रेम रूपावर बसले तर, तो तिच्याशी विवाह करायला मागे पुढे पाहाणार नाही. एका मोलकरणीची बेवारशी मुलगी, तिच्याशी कसे लग्न करायचे, असा विचार त्याच्या मनातही येणार नाही. जर या भिकारणीशी त्याने लग्न केले तर, ती केवढी अप्रतिष्ठा! आपली नाचक्की होईल. आपले केवढे घराणे! तिकडे प्रतापची बहीण काय म्हणेल? त्याची आई काय म्हणेल? अशा मुलीशी लग्न करणे बरे नाही, शोभत नाही असे कोणी प्रतापला म्हणले तर, तो म्हणाला असता, ‘काय हरकत आहे? मी एक मानवता ओळखतो. कृत्रिम उच्चनीच भेद मी मानीत नाही. श्रीमंत ते सारे थोर आणि दरिद्री ते हीन असे म्हणणे वेडेपणा आहे; श्रीमंत माणसे नीच असतात तर गरीब माणसे थोर असतात.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel