‘त्याच्यादेखत नको. तो घेईल. तुम्ही हळूच द्या.’

त्याने त्या नोटा हातात चुरगाळल्या. तो मनांत म्हणाला, ‘पूर्वीची निष्पाप रूपा मेली. ही सुधारणे कठीण आहे. का बरे मी हिचे लफडे लावून घ्यावे? ती मला बुडवील. माझा इतरांसही मग उपयोग होणार नाही. आज पैसे देऊन शेवटचा रामराम करावा.’ परंतु हे विचार त्याला आवडले नाहीत. त्याने ते झडझडून दूर केले. हृदयांतील क्रांतीदेव निराळी भाषा बोलत होता.

‘रूपा, मी तुझी क्षमा मागायला आलो आहे. तू करशील ना क्षमा?’ त्याने विचारले.

परंतु तिचे लक्ष त्याच्या शब्दांकडे नसून त्याच्या हातीतील नोटांकडे होते. अधिकार्‍याची दृष्टी अन्यत्र वळताच तिने पटकन् त्याच्या हातातून त्या घेतल्या.
काय म्हणत होता?’ तिने हसत तिरस्काराने जणू विचारले. हिच्या हृदयांत आपल्याविषयी वैरता आहे. तिरस्कार आहे, असे त्याला वाटले. परंतु म्हणूनच आपण अधिक निश्चयाने तिच्या हृदयात स्वत:विषयी अनुकूलता निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे त्याने ठरविले. तो अधिकच तिच्याकडे ओढला गेला. स्वत:विषयी अनुकूलता तरी कशाला! ती चांगली होवो. मी निरपेक्षपणे नि:स्वार्थ हेतूने तिच्या कल्याणासाठी खटपट केली पाहिजे. मला स्वत:ला शून्य करू दे.

‘रूपा, तू तिर्‍हाइतासारखे का बोलतेस? मी तुला ओळखतो, स्मरतो. ते मागचे दिवस मला आठवतात.’

‘परंतु जे झाले गेले ते आठवून काय फायदा?’

‘पुन्हा सारे नीट व्हावे, गोड व्हावे म्हणून. मी काय सांगू? मला पश्चात्ताप झाला आहे. मी तुझ्याजवळ लग्नही...’

परंतु हे त्याचे शब्द संपतात न संपतात तोच तिच्या डोळयांत एक प्रकारची कठीण भीषण कठोरता त्याला दिसली. त्याला पुढे बोलवेना. तिच्या डोळयांत त्याला दूर लोटणारी वृत्ती होती; काही तरी असत् भाव तेथे होता.

भेटीला आलेली मंडळी जाऊ लागली. वेळ संपली. तो अधिकारी येऊन म्हणाला, ‘आटोपा.’ प्रतापला पुष्कळ बोलायचे होते. परंतु या वेळेस सारे बोलणे शक्य नव्हते.’

‘मी पुन्हा येईल. सारे बोलेन.’ तो म्हणाला.

‘आपण सारे बोललो. आता काय बोलायचे राहिले आहे?’

त्याचा हात हातात घेऊन ती म्हणाली. त्याने तो हात दाबला नाही.

तो पुन्हा म्हणाला, ‘मी येईन. सारे बोलेन.’

‘या पुन्हा.’ ती म्हणाली.

‘रूपा, बहिणीहून तू अधिक वाटतेस.’

‘तुम्ही असे काय चमत्कारिक बोलता?’

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel