‘निराश नको होऊ. राजाकडे अर्ज करू. मी अर्ज आणला आहे. त्याच्यावर सही कर. यश येईल. धीर धर.’ तो म्हणाला.
‘मी त्या गोष्टीचा नाही विचार करीत.’
‘मग कसला?’
‘मी दवाखान्यात होते. तेथे तुम्हांला त्यांनी काही सांगितले असेल. परंतु...
‘जाऊ दे. तू नि तुझ्या भानगडी, नकोत त्या ऐकायला.’ कपाळाला आठया घालून म्हणाला. थोडा वेळ कोणी काही बोलले नाही. नंतर त्याने खिशातून अर्ज काढला.
‘येथे सही कर.’ तो म्हणाला.
तिने अर्ज हातात घेतला. तो तिच्या पाठीशी उभा राहून तिच्या सहीकडे बघत होता. त्याच्या मनांत पुन्हा दया, प्रेम यांच्या भावना आल्या. गरीब बिचारी रूपा. आणि त्याने केलेल्या पापामुळे ती या स्थितीला येऊन पोचली नव्हती का? त्याच्या मनांत स्वत:चे पाप आधी उभे राहिले की तिच्याविषयीची करूणा? काही असो. आपणच अपराधी असे त्याला वाटले आणि म्हणून तो करूणेने तिच्याकडे पाहू लागला. तिने सही केली. बोटाला लागलेली शाई तिने केसांना पुसली, नेसूच्या कैदी पातळाला पुसली. ती उभी राहिली. तिने त्याच्याकडे पाहिले.
‘हे बघ रूपा, काहीही होवो. माझा निश्चय अभंग आहे. मी बोलल्याप्रमाणे सारे करीन. ते तुला कोठेही नेवोत. मी तुझ्याबरोबर असेन.’ तो म्हणाला. आपण तिला क्षमा केली हा विचार मनांत येऊन त्याच्या दयेच्या नि करुणेच्या भावना अधिकच कोमल झाल्या होत्या.
‘काय उपयोग?’ ती म्हणाली.
‘आता तुम्हांला काळया पाण्यावर नेतील. वाटेत काय काय लागेल त्याचा विचार करून ठेव.’
‘मला काही नको. कशाला करता हे सारे? पुरेत हे उपकार.’ ती म्हणाली.
प्रताप उठला. वेळ संपली असे जेलरने सांगण्यापूर्वीच तो उठला. हृदयात अपार शांती नि आनंद भरून आला होता. प्राणिमात्राविषयी त्या क्षणी त्याला प्रेम वाटत होते. रुपा कशीही वागली तरी आपल्या हृदयांतील प्रेम कमी होणार नाही या विचाराने त्याला कृतार्थता वाटत होती. आजपर्यंत अशा परमोच्च जीवनाचा त्याला आधी अनुभव आला नव्हता. रूपाने दवाखान्यात काही भानगड केली. करू दे. मी तिजवर प्रेम करतो ते तिच्यासाठी म्हणून, प्रभूसाठी म्हणून. मी माझ्या स्वार्थासाठी थोडेच प्रेम करतो आहे?
खरे म्हणजे दवाखान्यात रूपाने काही केले नव्हते. ती तेथे काही काम करीत होती. इतक्यात तिला सतावणारा तो दुय्यम डॉक्टर तिच्याशी फाजिलपणाने बोलू लागला. तिला संताप आला. तिने त्याला जोरात ढकलले. तेथील एका फळीला त्याचा धक्का लागला. तिच्यावरील बाटल्या खाली पडल्या नि खळकन् फुटल्या. इतक्यात मुख्य डॉक्टर तिकडून जात होता. रूपा हळूच तिकडून जात होती. लज्जा, क्रोध यांनी तिचा चेहरा लालसर दिसत होता.