‘तू अशाने सुखी होशील असे वाटत नाही.’

‘माझ्या सुखाचा प्रश्न नाही.’

‘तिला हृदय असेल तर तीही सुखी होणे अशक्य आहे.’

‘तिलाही सुखाची इच्छा नाही’

‘ठीक. परंतु जीवनात...’

‘जीवनात? काय हवे जीवनात?’

‘जीवनाला अनेक गोष्टींची जरूर असते.’

‘जीवनात एकाच गोष्टीची जरूर आहे आणि ती म्हणजे ज्याने त्याने योग्य ते करणे.’

‘मला नाही समजत तुझे बोलणे.’

त्याला बहिणीची कीव आली. हीच का ती बहीण, कोमल भावनांची, उदार हृदयाची, असे त्याच्या मनांत आले. लहानपणाच्या कोमल अशा शतस्मृती डोळयांसमोर आल्या. लग्न झाले. हा स्वार्थी नवरा गळयांत पडला. आणि माझ्या बहिणीच्या सर्व सुसंस्कृत, कोमल भावना का नष्ट होऊन जाव्यात? त्याने करूणेने बहिणीकडे पाहिले.

इतक्यांत तिचे गलेलठ्ठ यजमान उठून आले. आखूड बाह्यांचा सदरा अंगात होता. ते केसाळ हात दणकट दिसत होते.

‘बहीणभावांचे काय चालले आहे बोलणे? माझ्यामुळे व्यत्यय तर नाही ना आला?’ तो म्हणाला.

‘मुळीच नाही. आमचे काही गुप्त बोलणे नाही. मी त्याला त्याच्या करण्यातील हेतू विचारीत होते. त्या मुलीशी- मुलगी कसली, ती निगरगट्ट वेश्या- तिच्याशी हा लग्न लावू म्हणतो, तिच्याबरोबर काळया पाण्यावर जाऊ म्हणतो.

‘खरेच प्रताप. मला बोलण्याचा काय अधिकार? परंतु तुमची बहीण माझी पत्नी. आमच्या प्रतिष्ठेलाही तुमच्या अशा करण्याने धक्का नाही का बसत? मोठमोठयांकडे आम्हांला जावे लागते. कोणी प्रश्न विचारला तर मान खाली व्हायची. तुम्ही हे सारे का करू इच्छिता? का त्या बाईशी लग्न लावता?’

‘या स्त्रीच्या अध:पाताला मूळ कारण मी. म्हणून मी हे सारे करू इच्छितो. मी अपराधी आणि तिला बिचारीला शिक्षा!’

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel