३
रूपा जर काळया पाण्यावर गेली तर प्रतापही जाणार होता. तो आपली सारी जमीन शेतकर्यांना वाटून देऊ इच्छित होता. परंतु त्याच्या मनात नक्की काही ठरेना. माणसे नदीप्रमाणे असतात. ती कधी दयाळू असतात, तर कधी क्रूर बनतात. कधी कष्टाळू असतात तर कधी सुखविलासी बनतात; कधी आसक्त तर कधी विरक्त; कधी शहाणपणा दाखवतात तर कधी कमालीचा मूर्खपणा करतात. अशा विरोधातून माणूस विकासाकडे जात आहे. प्रतापचे असेच आजपर्यंत होते. आता कोठे स्थिर असे वळण त्याच्या जीवनाला लागत होते. तरीही अधूनमधून अनिश्चितता डोकावे. एखदा सारी जमीन देऊन टाकावी असे त्याला वाटे, तर पुन्हा वाटे जर आपण रूपाशी लग्न लावले तर घरदार, जमीनजुमला नको का?
त्याने आपल्या जमीनदारीवर जाण्याचे ठरविले. प्रथम तो आईची इस्टेट होती, ती पाहायला गेला. तेथे त्याचे दिवाणजी होते. त्यांच्याशी त्याने चर्चा केली.
‘सारी शेती यंत्रे लावून घरीच करा. शेतकर्यांना कमी खंडाने दिलीत तरीही ते शेती बिघडवतील, जमीन बिघडवतील. तुम्ही सारी शेती खंडाने दिलीत तर या सर्व अवजारांचे काय करायचे? हे वाफेचे नांगर आहेत, इतर यंत्रे आहेत. गाई-गुरे, बैल, सारे का विकून टाकायचे? त्यांची किंमत नीट येणार नाही. मातीमोलाने हे सारे विकावे लागेल. तुम्ही माझे ऐका; सारी शेती यांत्रिक करून टाका. भरपूर फायदा होईल. तुम्हांला अनुभव आलाच आहे. जी काही जमीन आपण घरी करतो, ती कशी किफायतशीर पडते. खरे ना?
‘माझी इच्छा खंडाने देण्याची आहे.’ प्रताप म्हणाला
‘धन्याच्या इच्छेविरूध्द मी नाही. आज मी कुळांना बोलावले आहे. ती येतीलच आता.’
थोडया वेळाने कुळे आली. तेथे बाजूला बसली.
‘तुम्ही यायला उशीर केलात. या मालकांना बसावे लागले. धनीसाहेबांची इच्छा आहे की, तुम्हांला सारी जमीन खंडाने द्यावी.’
‘द्या. भरपूर जमीन द्या. यांची आई चांगली होती. हेही तसेच असतील. आम्हांला दूर लोटू नका. सारी जमीन तुम्हीच घरी करू लागलात तर आम्ही काय खावे? तेथून उठून का शहरांत जाऊ? तेथे तरी कोठे काम आहे? तेथेही बेकार आहेत.’
‘तुमच्या काही तक्रारी आहेत?’ प्रतापने विचारले.
‘एकच तक्रार की भरपूर जमीन मिळत नाही. ती तक्रार दूर करा.’
त्यासाठी तर मी येथे आलो आहे. सारी जमीन मी तुम्हांला देऊ इच्छितो.’