‘काय आहे काम?’

‘अहो, त्या दिवशी त्या रूपाला तुम्ही नोटा दिल्यात. झडतीत तिच्याजवळ सापडल्या. असे कायद्याविरूध्द काही करीत नका जाऊ. हे पैसे मी तिच्या नावावर ठेवतो. तिला जे सामान लागेल ते तिने यातून मागवावे आणि एका राजकीय कैद्याने तुम्हाला ही चिठ्ठी दिली आहे.’

‘तो जेलर गुप्त पोलिसांचेही काम करी. प्रतापचा राजकीय कटवाल्यांशी संबंध आहे की काय हे त्याला पाहायचे असेल, राजकीय कैद्यांना वाटे की, जेलर आपले काम करतो. परंतु जेलरचे हेतू निराळे होते. प्रतापने तेथेच ती चिठ्ठी वाचली. उगीच गुप्तता कशाला?
ती राजकीय कैदी एक स्त्री होती. ती शाळाशिक्षक होती. पुष्कळ वर्षांपूर्वीची गोष्ट. प्रताप एकदा शिकारीस गेला होता. तो एका हॉटेलात उतरला होता. तेथे ती त्याला प्रथम भेटली होती. ती त्याला तेव्हा म्हणाली, तुम्ही श्रीमंत लोक ‘जुगार, शिकार, शर्यती यांत पैसे उधळता. गरिबांना शिकायला का नाही मदत करीत? मला कराल का काही मदत? मी शिकेन. मी पुढे पैसे परत करीन.’ आणि त्याने तिला हवे होते तेवढे पैसे खिशांतून काढून दिले. तिने त्याचे आभार मानले. तो म्हणाला, ‘मीच तुमचे आभार मानायला हवेत. तुम्ही कर्तव्याचा पंथ दाखवलात.’ ते पैसे देताना त्याला किती आनंद झाला होता! त्याला तो प्रसंग आठवला. त्या वेळचे शरीराचे, मनाचे निरोगी सामर्थ्य, त्या वेळचा उत्साह. उल्हास सारे त्याला आठवले. ती स्त्री पुढे शाळेत शिक्षिका झाली. क्रांतिकारकांशी संबंध असल्या संशयावरून ती तुरूंगात स्थानबध्द होती. ‘माझी भेट घ्या.’ असे तिने स्वत:ची पूर्वीची ती ओळख देऊन विनविले होते.

‘यांना भेटता येईल?’ त्याने विचारले.

‘राजकीय कैद्यांना नातलगच भेटू शकतात. तुम्ही अधिकार्‍यांची परवानगी आणा.’

‘तसेच एक माता नि तिचा मुलगा आग लावण्याच्या आरोपावरून येथे आहेत, त्यांना भेटायचे होते.’

‘पुढच्या वेळी याल तेव्हा परवानगी देऊ. आज आता उशीर झाला आहे.’

‘ठीक. येतो. आभारी आहे.’

प्रतापराव निघून गेला. तो घरी आला. आज तो बाहेर फारसा कोठे गेलाच नाही. फक्त संध्याकाळी एका बडया अंमलदाराला भेटून त्या राजकीय स्थानबध्द स्त्रीच्या भेटीची त्याने परवानगी आणली. रूपाला आता तो वाटेल तेव्हा भेटू शकत असे. त्या दिवशी रात्री अनेक विचारांत तो मग्न होता. रूपाच्या अर्जाचे उत्तर येईपर्यंत तो मावश्यांच्या इस्टेटीकडे जाऊन येणार होता. ती जमीन शेतकर्‍यांना वाटून द्यावी असे त्याच्या मनात येत होते. तो स्वत: शेतकर्‍यांना भेटणार होता. त्यांच्याजवळ विचारविनिमय करणार होता. सारे देऊन तो अकिंचन होऊ इच्छित होता. त्याला आनंद होत होता. माझा ध्येयवाद, माझे उदार जीवन, माझी न्यायबुध्दी, माझी सत्यनिष्ठा पुन्हा येत आहेत असे मनांत येऊन त्याला परम समाधान वाटत होते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel