‘तुझ्याजवळ मी क्षमा मागतो. तू क्षमा करणे कठीण हे मी जाणतो. परंतु गत गोष्टी कशा बदलता येतील? यापुढे जे जे माझ्या हातांत आहे ते ते मी करीन.’

‘तुम्ही मला कसे शोधून काढलेत? कसा मिळाला पत्ता? मी येथे आहे हे कसे कळले?’

‘मी त्या ज्यूरीत होतो. तू मला ओळखले नाहीस?’

‘नाही. ओळखायला वेळ कोठे होता! मी तुमच्याकडे पाहिलेही नाही.’

‘बाळ झाले होते ना?’ त्याने कापर्‍या आवाजात विचारले.

‘परंतु देवाच्या दयेने ते लौकरच गेले.’ ती पटकन् म्हणाली.

‘का मेले?’

‘मीही आजारीच होते. मी मात्र दुर्दैवी वाचले.’

‘माझ्या मावश्यांनी तुला ठेवले नाही?’

‘जिच्या पोटात बाळ आहे तिला कोण ठेवील? त्यांच्या लक्षात येताच त्यांनी मला घालविले. परंतु आता बोलून काय फायदा? मला काही आठवत नाही. ते सारे झाले गेले संपले.’

‘नाही, संपले नाही. मी माझे पाप दूर करू इच्छितो.’

‘परंतु आता ते कसे दूर करणार? तुम्ही कशाची भरपाई करणार? जे झाले ते झाले. आता ते परत का येईल?’ असे बोलून दु:खाने तिने त्याच्याकडे पाहिले.

‘तोच हा’ अशी स्मृती होताच तिच्या हृदयात कोमल भावना उचंबळून आल्या होत्या. परंतु पुन्हा ती कठोर झाली. त्या कोमल मधुर सुंदर भावना तिने बलाने खाली दाबल्या. तो पूर्वीचा नवतरूण तो का हा? तो प्रेमळ उदार तरूण तोच का हा? नाही; याचा त्याचा काही एक संबंध नाही असे तिने मनात ठरविले. जरूर तेव्हा स्त्रियांना भोगणार्‍या इतर पुरूषांप्रमाणेच हा एक. माझ्यासारख्या स्त्रियांनी ज्यांचा उपयोग करून घ्यावा, असा हा एक, असे ती मनात म्हणाली. इतरांना भुलविण्यासाठी, मोह पाडण्यासाठी जशी ती हसे, त्याप्रमाणे आता ती त्याच्याकडे पाहून हसली.

‘ते सारे संपले. मी आता काळया पाण्यावर जाणार आहे.’

‘तू निरपराधी आहेस. माझी खात्री आहे.’

‘मी अपराधी खरेच नाही. मी का चोर, डाकू, विष देणारी, खुनी आहे? अपील करण्यात येईल तर मी सुटेन. परंतु ते खर्चाचे काम.’

‘मी एका बॅरिस्टरांजवळ अपिलासंबंधी बोललो आहे.’

‘करा अपील. पैशाकडे पाहून नका. चांगला बॅरिस्टर द्या.’

‘शक्य ते सारे मी करीन.’

तिने पुन्हा त्याच्याकडे पाहून ते वेश्यास्मित केले.

‘मला थोडेसे पैसे द्याल का? पंचवीस रूपये पुरेत.’ ती हळूच म्हणाली.

‘हो. देईन.’ असे म्हणून त्याने खिशांत हात घातला. परंतु तेथे अधिकारी होता.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel