‘फटक्यांची शिक्षा रद्द ना आहे?’
‘तुरूंगात फितुरी करणार्यांना आहे.’
प्रताप पुन्हा कचेरीत आला. तेथे आणखी कांही मंडळी आली होती. कोण होती ती? तेथे एक दोन-तीन वर्षांचा मुलगा होता. तो तेजस्वी होता. तो मुलगा प्रतापकडे आला नि म्हणाला,
‘तुम्ही कोणासाठी आलात?’
‘एका बाईला भेटायला.’
‘ती का तुमची बहीण आहे? तुमची आई आहे?’
‘नाही हो बाळ. तू कोणाचा?’
‘माझी आई आहे येथे तुरूंगात. ती राजबंदी आहे. मी तिचा मुलगा.’
तो मुलगा जिच्याबरोबर आला होता तिने त्याला जवळ घेतले.
‘काय विचारीत होता तो तुम्हांला? एवढासा आहे परंतु सार्या त्याला उठाठेवी. तो तुरूंगातच जन्मला. तो आईबरोबर पुढे काळया पाण्यावर जाणार आहे.’
‘बरे बरे’ असे म्हणून त्या बाळाला घेऊन ती तरूणी बाजूला जाऊन बसली.
प्रतापला आज त्या राजकीय स्त्रीसही भेटायचे होते. तिला भेटून मगच तो रूपाला भेटणार होता. ती राजकीय स्त्री आली. तिचे डोळे प्रेमळ, शान्त होते. तिच्या तोंडावर ध्येयार्थी हास्य होते.
‘तुम्ही आलांत, बरे झाले. मी आभारी आहे.’
‘तुम्हा या तुरूंगात असाल मला कल्पनाही नाही.’
‘मी सुखी आहे, आनंदी आहे. मला आमच्या पक्षाच्या कामाशिवाय दुसरे काही नको आहे. मी शाळाशिक्षिकेची जागा सोडून पुढे सेविका झाले. क्रांतिकारकांशी माझा संबंध असे. शेवटी अटक झाली. माझ्याबरोबर एका मुलीसहि अटक झाली. ती आमच्या पक्षाचीही नव्हती. तेव्हा तरी नव्हती. तिला एका किल्ल्यात-बहुद्या नगरच्या, स्थानबध्द करून ठेवण्यात आले आहे असे कळते. तिच्याजवळ काही आक्षेपार्ह पत्रे, पुस्तके सापडली. माझ्यामुळे तिला अटक. मी ते कागद, ती पुस्तके तिच्याजवळ ठेवली. तिला काय माहीत की ते सारे आक्षेपार्ह वाङमय आहे म्हणून. तुम्ही तिच्या सुटकेची खटपट करा. दुसरी गोष्ट म्हणजे एक तरूणही याच किल्ल्यात डांबून ठेवलेला आहे. त्याची आई त्याला भेटायला अधीर आहे. परवानगी मिळत नाही. तुम्ही या मायलेकरांची भेट करवा. तसेच त्या तरूणास काही शास्त्रीय ग्रंथ पाहिजे आहेत. तो शास्त्रांचा विद्यार्थी होता. विज्ञानाची त्याला फार आवड. त्याला तेथे ‘गीता’, ‘मनाचे श्लोक’ देतात; परंतु शास्त्रीय पुस्तके देत नाहीत. ती पुस्तके त्याला मिळतील असे करा. यासाठी तुमची भेट हवी होती. मला व्यक्तिश: काही नको. मी सुखी आहे. ध्येयासाठी जगणे, ध्येयासाठी मरणे याहून धन्यतेचे दुसरे काय आहे? खरे ना? आमची क्रांती कशी यशस्वी होईल? जगता सुखी केव्हा होईल? सारा अन्याय कधी संपेल, याचीच एक चिंता आम्हांला असते. अच्छा, वंदे मातरम्!’