तिने त्याचा हात कितीतरी वेळ आपल्या हातात ठेवला होता. शेवटी ती म्हणाली,
‘प्रताप, तुला जे महत्वाचे वाटते ते तुझ्याविषयी आपलेपणा वाटणार्यासही महत्वाचे नसेल का वाटत? आज तू नाही सांगत. उद्या येशील?
‘उद्याही बहुधा वेळ होणार नाही. मी जातो क्षमा कर.’ असे म्हणून प्रताप गेला. ती गॅलरीत उभी होती. ‘हा आपणास सोडून देणार का? मी त्याला नाही का आवडत? गोष्टी इतक्या थरावर येतील असे नव्हते वाटले.’ असे विचार तिच्या मनात चालले होते. ‘गोष्टी इतक्या थरावर म्हणजे ग काय’ असे कोणी तिला विचारले असते तर मात्र तिला नीट काही सांगता आले नसते.
तो विचार करीत घरी येत होता. त्याला सारे जग घाणींचे माहेरघर वाटले. ‘शी, सारी घाण घाण’ असे तो म्हणत होता. ती रूपा त्याच्या डोळयांसमोर आली. पूर्वीची ती पहिली भेट त्याला आठवली. ती निर्मळ, सुंदर, प्रेमळ रूप! ती रूपा आज वेश्या होती! आणि तो? तोही एका काळी ध्येयार्थी होता. उदारमतवादी होता. परंतु आज तो कसा होता? तिकडे त्या एका अधिका-याच्या पत्नीजवळ त्याने काही तरी करार केला होता. इकडे ही तरूणीही त्याला बध्द करू पाहत होती. आज तो पुन्हा जमीनदार झाला होता. आईची सारी इस्टेट त्याला मिळाली होती. आणि त्या दोन्ही मावश्या मेल्यामुळे त्यांचीही इस्टेट आता त्यालाच मिळाली होती. जमीनदार म्हणजे केवळ अन्याय, असे तो पूर्वी म्हणे आणि आज?
जमीनदारी का सोडायची? रूपाचे काय करायचे? तिला का मी संकटात सोडून देऊ? मी तिच्यावर प्रेम केले होते. मी तीला शंभराची नोट दिली. पैसे देऊन का पापाचे प्रायश्चित घेता येते? आजही मी तिला खूप पैसे देऊ शकेन. परंतु त्याने काय होणार आहे? माझा उध्दार होईल का? तिचा होईल का?
आणि पैसे तरी कोणाचे? आईच्या, मावश्यांच्या इस्टेटीचे. मी केवळ लफंग्या आहे. दांभिक आहे. मी जगाची फसवणूक करीत आहे. जग मला चांगले. म्हणत आहे. परंतु मी तसा आहे का? मी स्वत:ला चांगले म्हणू शकेन का? मला स्वत:ची शिसारी येत आहे.
तो घरी आला. त्या खोलीत बसला. तेथील सुखसंभाराकडे त्याचे लक्ष नव्हते. तो जगाला विटला होता. कारण त्याला स्वत:चाच वीट आला होता. स्वत:च्या तिरस्काराची प्रतिक्रिया जगाचा तिरस्कार करण्यात होती. आपण नीच आहोत, असे स्वत:शी कबूल करण्यात त्याला एका प्रकारचा शान्त, दान्त आनंद होत होता. आज जणू पुन्हा आध्यात्मिक अभ्यंगस्नान त्याला घडत होते. खळमळ दूर होत होता. हृदय हेलावत होते. आत्मा जागा झाला. मंजुळ मुरली अंतरी वाजू लागली. कोपर्यात मृतवत् पडलेली सद्सदविवेकबुध्दी पुन्हा वर मान करून अंतरंगी उभी राहिली. आतापर्यंत त्याला आंतरिक जीवन जणू नव्हते. गेली आठ-दहा वर्षे केवळ बाह्य जीवन तो जगत होता. देहाचे, इंद्रियांचे जीवन! आत्मानंद दूर राहिला होता. परंतु आज हृदयात प्रचंड वादळ घो घो करून उठले. प्रचंड लाटा उठल्या. प्रचंड खळबळ सुरू झाली. डबक्याप्रमाणे साचीव डबक्याप्रमाणे बनलेल्या त्याच्या जीवनात वेगाची हालचाल सुरू झाली. डबक्यात निर्मळता येऊ लागली. सारा कचरा दूर झाला. आयुष्यात कितीदा तरी अशी घुसळणे होतात. पुन:पुन्हा जमलेली घाण दूर होते. शिक्षण संपल्यावर प्रथम प्रथम साधी नोकरी करू लागला. पुढे तो लष्करात गेला. लढाईच्या वेळेस बलिदान व्हावे अशीही त्याने इच्छा केली होती. तो मेला नाही. पुढे त्याने लष्करी पेशा सोडला. त्याने कलांचा अभ्यास सुरू केला. असे किती तरी जीवन निघून गेले. परंतु खरे जीवन अद्याप पुढे होते.