‘ही मंडळी येथे का?’ सुभेदाराने विचारले.

‘कोर्टातून आली आहेत.’

‘आत न्या त्यांना लौकर.’

आणि रामधन व रमी, रूपा यांना पुन्हा त्या औरत कोठडयांत नेण्यांत आले.

‘काय झाले रूपा?’ म्हातारीने विचारले.

‘सर्वनाश! तीन वर्षे शिक्षा.’

‘तीन वर्षे आहेत ना? आता जातील. सात-आठ महिने सूट मिळेल. तू देखणी आहेस. अधिकसुध्दा मिळेल. ये रडू नकोस. रडायचे कशाला?

रूपा त्या खोलीत गेली नि पडून राहिली. रात्र झाली. पहारेवाल्यांची आलबेल सुरू झाली. रूपा रडत होती. आकाशांत तारे थरथरत होते.

प्रतापरावाला खटल्याचा निकाल लागल्यावर अत्यंत वाईट वाटले. आपण ते शब्द वगळले ही केवढी चूक केली! इतरांचे एक राहो; परंतु आपण तरी अधिक काळजीपूर्वक काम केले पाहिजे होते, असे राहून राहून त्याच्या मनात येई. प्रतापने पुन्हा त्या न्यायाधिशाला गाठले. काय करता येईल म्हणून विचारले.

‘तुम्ही दादासाहेब बॅरिस्टरांकडे जा. अपील करता येईल.’ असे म्हणून त्याने घडयाळाकडे पाहिले.

प्रतापराव आभार मानून निघाला. त्या बॅरिस्टराच्या घरी तो आला. बॅरिस्टर कामात होते.

‘मला थोडे तुमच्याजवळ बोलायचे आहे.’

‘बरे, बोला.’

‘एका निरपराधी बाईला सोडवावयाचे आहे. तिला विनाकारण शिक्षा झाली आहे.’

‘बरे.’

‘वरिष्ठ कोर्टाकडे अपील करायचे आहे. तुम्ही यात लक्ष घाला. मी होईल तो खर्च करीन.’ असे म्हणून त्याने त्या खटल्याची हकीगत सांगितली.

‘आता मी कामात आहे. तुम्ही परवा या. मी विचार करून ठेवीन.’

प्रतापराव निघून गेला नि सकाळी जिच्या आईने चिठ्ठी पाठविली त्या तरूणीच्या घरी तो आला. तिचे वडीलही आज घरी होते. ते लष्करात मोठे अधिकारी होते. स्वभावाने ते दुष्ट होते. सैनिकांना जरा काही चुकताच फटक्यांची शिक्षा ते देत. काही विशेष कारण नसता गोळी घालायचे, फाशीही द्यायचे. ते श्रीमंत होते, सत्तांध होते. त्यांना कोणाची पर्वा नसे.

‘आलेत ज्यूरीत काम करून? निर्दोषी सोडले असेल गुन्हेगारांना! समाजाचा पाया उखडणे हे तुमचे काम. निरपराध्यांना शिक्षा आणि अपराध्यांची मुक्तता.’ असे म्हणून तो लष्करी अधिकारी रूबाबात हसला.

‘समाजाचा पाया उखडणारे! बरोबर, अगदी बरोबर. नवीन लोकांचे हे लोकशाहीचे प्रकार. म्हणे ज्यूरी हवी. कशाला हवी ज्यूरी? न्यायाधीशांपेक्षा का ज्यूरीतील लोकांना कायदा अधिक कळतो?’ तेथील दुसरे एक लठ्ठंभारती गृहस्थ म्हणाले.

‘बाबा, तुमच्या चर्चा राहू देत. प्रतापरावांना भूक लागली असेल. ते थकले आहेत. त्यांना आधी जेवू दे.’ मुलगी म्हणाली.

‘तुम्ही सिनेमाला नाही गेलात?’ प्रतापने विचारले.

‘तुम्ही नाही बरोबर, मग जाण्यात काय मौज?’ ती म्हणाली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel