‘तो मरेल.’ एक म्हातारी बाई दु:खाने म्हणाली.
‘त्याची बटने तरी म्हणावे सैल करा.’ दुसरा कोणी म्हणाला.
‘अशा अशक्तांना उन्हांत बाहेर काढतात तरी कशाला?’ तिसरे कोणी उद्गारले.
‘तुम्ही चालते व्हा. तुमचे तेथे काम नाही.’ पोलीस गरजला.
‘परंतु ज्यांचे काम आहे ते तर दुर्लक्ष करतात! माणसांना असे मारणे का बरे? कैदी असला तरी तोही मनुष्य आहे.’ रस्त्यातील लोक म्हणाले.
इतक्यात प्रताप तेथे आला.
‘त्याचे डोके वर उचलून त्याला पाणी द्यायला हवे.’ तो वाकून म्हणाला.
‘तुम्ही दूर व्हा. पाणी आणायला माणूस पाठवला आहे.’ पोलीस म्हणाला.
इतक्यांत एक बडा अधिकारी तेथे आला. चकचकीत बूट, लखलखीत बटणे, हातात वेताची छडी, असा कोणी आला.
‘तेथे उभे नका राहू. व्हा दूर.’ तो अधिकारवाणीने म्हणाला.
लोक पांगले. त्याने पोलिसास गाडी आणायला सांगितले.
‘गाडी येत आहे.’ पोलीस म्हणाला.
‘आधी पाणी आणा.’ प्रताप बोलला.
‘अधिकार्याने कठोरपणे प्रतापकडे पाहिले. परंतु काही बोलला नाही. इतक्यात पाणी आले.
‘ओता त्याच्या डोक्यावर.’ अधिकारी म्हणाला.
त्याच्या डोक्यावरची टोपी काढून पाणी ओतण्यात आले. त्याने डोळे उघडले. थोडे पाणी तोंडात घालण्यात आले. परंतु त्याचे सारे अंग थरथरत होते. छाती धापा टाकीत होती.
गाडी येईना.
‘ही यांची गाडी घ्या.’ पोलीस म्हणाला.
‘ही दिलेली आहे.’ तो गाडीवान म्हणाला.
‘काही हरकत नाही. तू याला पोचव. मी तुझे भाडे देईन.’ पोलीस नि तो अंमलदार गाडीत बसले. त्या कैद्याची ती टोपी रस्त्यात पडली होती. पोलीसाने त्या मरणोन्मुख कैद्याच्या डोक्यावर ती पुन्हा ठेवली! सरकारी सामान सारे व्यवस्थित हवे.
गाडीपाठोपाठ प्रताप गेला. आले पोलिस स्टेशन. त्या कैद्याला उचलून आत नेण्यात आले. प्रतापही मागोमाग गेला. तेथे एक वेडा होता. ‘मला हे सतावतात. मला वेडा म्हणतात. माझ्यावर प्रयोग करतात. मला भीती घालू बघतात. परंतु मी यांच्या बापाला भिणार नाही.’ असे तो वेडा बोलू लागला. प्रतापला अडवून सांगू लागला. परंतु प्रतापचे लक्ष नव्हते.