माझे भाऊ नवानवसाचे आहेत, त्यांच्यावर दृष्ट नको पडायला. ते कडू असले तरी देवाच्या दारातले आहेत, देवाने दिलेले आहेत :
माझा भाईराया कसा का असेना
त्याच्यासाठीं प्राणा टाकीन मी ॥
भाऊ कसा असला तरी त्याच्यावर प्रेम करायला बहीण तयार आहे. मग गुणी भावाबद्दल तिला किती प्रेम वाटेल ! माझा भाऊ उदार, शहाणा, मातृभक्त आहे. लोकांची लांबून आलेली पत्रे माझा भाऊ सभेत वाचून दाखवतो, तो कसा हसतो, कसा गोड दिसतो. किती वर्णावे ?
काशींतले कागद आले डब्यांतून
वाचले सभेंतून भाईरायांनी ॥
पूर्वी कोणी काशीस जाई तेव्हा सर्व गावाचा निरोप घेऊन जाई, सुखरूप परत आला तर सारे गाव सामोरे जाई. बहुधा बरीच मंडळी एकदम निघत, आणि मग नळकांडयातून पत्र आले सांडणीस्वाराबरोबर किंवा कोणाबरोबर, तर सारा गाव कुशलवार्ता व इतर बातमी ऐकायला जमा होई. तेथे पत्र कोण वाचून दाखवी ?
माझा आहे भाऊ शहाणा सुरता
त्याच्या लौकीकाची वार्ता चोहीकडे ॥
असा हा भाऊ आणखी कसा आहे ऐका :
हाताचा उदार मनाचा खंबीर
गुणारे गंभीर भाईराया ॥
गोड गोड बोले हंसणें किती गोड
जगत्रीं नाहीं जोड भाईरायाला ॥
कुणा ना दुखवील हंसून हांसवील
सार्यांना सुखवील भाईराया ॥
भाऊ नुसता गोड बोलणारा, गोड हसणारा नाही.