सविता संपूर्ण झाल्या मग करावें पारणें
वाचीलें रामायण बाप्पाजींनी ६१
सविता संपूर्ण झाल्या दिव्याला भरण
वाचीलें रामायण मामंजीनी ६२
सविता संपूर्ण झाल्या पदांची पोथी सोडी
गुरूला हात जोडी भाईराया ६३
उगवला भानू शेंदराचा थप्पा
आयुष्य मागे बाप्पा गोपूबाळ ६४
सोनेरी किरण डोंगराच्या माथां
नमन सूर्यनाथा उजाडत ६५
सूर्य नारायणा तापूं नको फार
बाहेर सुकुमार भाईराया ६६
सूर्य नारायणा तापूं नको फार
गांवा गेले छाया कर भाईराया ६७
सूर्य नारायणा गगनीं तापशी
लोकांचे पहाशी पापपुण्य ६८
उगवला भानू भानु नव्हे हा भास्कर
त्याला माझा नमस्कार दोन्ही हाती ६९
आंबे मोहरले आनंद कोकिळेला
वसंताच्या स्वागताला करितसे ७०
समुद्राच्या पाण्या स्वच्छता अणू नाहीं
नाचतें हालतें सदा खालीं वर होई ७१
कोठलेंहि असो पाणी समुद्र घे पोटी
उन्हाळा पावसाळा त्याला नाहीं कधी तुटी ७२
समुद्रा रे बापा किती टाहो तूं फोडशीं
पुत्र तुझा गोरागोरा जाऊन बसला आकाशी ७३
समुद्राच्या लाटा फेंस उधळती
गोड त्या चंद्राला फुलें अर्पिताती ७४
समुद्रा ग मध्यें लाटांचे उभे शेत
फेसाचें पीक येत अपरंपार ७५
भरली कृष्णाबाई जशा दुधाच्या उकळया
जटा ठेविल्या मोकळया दत्तात्रेयांनी ७६