कोल्हापूर शहर भोंवती विणकर
विणीती पीतांबर अंबाबाईचा ६१
कोल्हापूर शहर पाण्याच्या डबक्यांत
फुलांच्या झुबक्यांत अंबाबाई ६२
कोल्हापूर शहर विंचवांचे तळें
वस्ती केली तुझ्यामुळें अंबाबाई ६३
कोल्हापूर शहर दुरून दिसे मनोहर
पांच शिखरें लहानथोर अंबाबाईचीं ६४
येथून नमस्कार महादरवाजासन्मुख
माझी विनंति आईक अंबाबाई ६५
येथून नमस्कार महादरवाजापासून
आली रथांत बैसून अंबाबाई ६६
कोल्हापूर शहरी बुरुजा बुरुजा भांडी
वेशीच्या पहिल्या तोंडी अंबाबाई ६७
येथून नमस्कार पुण्याच्या पर्वतीला
दुष्टांच्या संगतीला लागूं नये ६८
पर्वती पर्वती सार्या पुण्याच्या वरती
हिराबागेची शेवंती फुलूनी गेली ६९
पर्वती पर्वती सार्या पुण्याच्या वरती
तेथून कृपा करिती देवदेव ७०
पर्वती पर्वती सार्या पुण्याच्या वरती
धरण बांधिले खालती इंग्रजांनी ७१
पर्वती पर्वती पर्वतीचा रमणा
दक्षिणा विद्वानांना वाटतात ७२
पर्वती पर्वती तिला कळस सोन्याचे
प्रिय दैवत पेशव्यांचे नवें झाले ७३
येथूनी नमावी पुण्याची चतु:शृंगी
दुष्टांच्या ग संगी लागूं नये ७४
चला जाऊं पाहूं तुळशीबागेचा सांवळा
नित्य पोशाख पिवळा रामरायाचा ७५
चला जाऊं पाहूं तुळशीबागेतला राम
जिवाला आराम संसारात ७६
पुणें झालें जुनें वाईला बारा पेठा
सवाई झेंडा मोठा कृष्णामाईचा ७७
काय सांगूं बाई वाई देशाची बढाई
तटाखालून कृष्णाबाई वाहतसे ७८
काय सांगू बाई वाई देशाची रचना
हिरे जडले सिंहासना कृष्णाबाईच्या ७९
पुणें झाले जुनें सातारा नित्य नवा
जलमंदिराची हवा चला घेऊं ८०